जालना / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम असून सध्या ते विविध भागात बैठक, महासंवाद मेळावे घेत आहेत. दरम्यान त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांबाबत पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता असं जरांगे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आदर्श आचारसंहित लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतो आहे. पण मी शांत बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे.
“मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला होता. गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं. त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले. एक वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही. त्यानंतर पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही. पण कारवाया सुरुच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे असंच दिसतं आहे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही. दुसरीकडून कारवाया सुरुच आहेत. ” असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे.