शिर्डी । नगर सहयाद्री
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार कांबळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात पुन्हा ट्विस्ट आला असून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध भाऊसाहेब कांबळे लढत होण्याची शक्यता आहे.
विधानसभा. निवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवून पराभव पत्कारावा लागल्यानंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांनी आमदार कांबळे यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती. आमदार कांबळे यांना विधानसभे काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता.
शिर्डीची जागा निवडून आणण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टाकली आहे. अशा परिस्थितीत भाऊसाहेब कांबळे सारखा मितभाषी उमेदवार मिळाला तर भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी चांगली लढत देता येईल, असा विचार पुढे आल्याने काल गुरुवारी माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेटीसाठी मुंबईत बोलावून घेतले होते.
आमदार कांबळे तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. दरम्यान काल गुरुवार दि. २१ मार्च रोजी रात्री उशिरा हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडला. आमदार कांबळे यांच्या प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे विरुध्द माजी आ. भाऊसाहेब कांबळे अशी लढत पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.