अहमदनगर। नगर सहयाद्री
आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक झाली. दिल्ली सरकारच्या दारु धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली.
अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांच्यासारखा माणूस आधी माझ्यासोबत काम करायचा. तेव्हा आम्ही दारुविरोधात आवाज उठवायचो. परंतु आता मात्र ते दारु धोरण बनवत आहेत. मला या गोष्टीचं खूपच दुःख झालं आहे. परंतु करणार काय? सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही.
अण्णा पुढे म्हणाले की, दारु धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, हे सगळं त्यांच्या कृतीमुळे झालं आहे. त्यांनी ते सगळं केलं नसतं तर अटकेचा संबंधच नव्हता. आता जे होईल ते कायद्याच्या दृष्टीने होईल. अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी तब्बल १० समन्स दिल्यानंतर ईडीने अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधातली याचिका मागे घेतली आहे. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेतल्याचं केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं आहे.