Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर करताच लोकसभा निवडणुकीचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र इतर राज्याच्या तुलनेत राजकीय घडामोडी अधिक वेग घेत आहेत. दरम्यान शरद पवारांची साथ मिळाल्यावर महायुतीला राज्यभरातील लोकसभा मतदारसंघात फटका बसणार असल्याचा दावा रासपने केला आहे.
भाजपकडून लोकसभा निवडणुकीत डावलले गेल्याने दुखावलेल्या महादेव जानकर यांना माढा लोकसभेतून शरद पवार यांनी उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महादेव जानकर यांनी महायुतीला इशारा देत एक दावाच केला आहे.
जानकर म्हणाले, जो काही धनगर आणि ओबीसी समाज आमच्यामुळे भाजपसोबत होता, तो आता भाजपकडे पाठ फिरवताना दिसेल. भाजपने मला डावलल्याने राज्यातील लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल असा दावाही त्यांनी केला.
शरद पवार यांनी मला हेरले, विश्वास टाकला, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असे सांगताना लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दिसेल असा इशाराही त्यांनी दिला.