अहमदनगर। नगर सह्याद्री
सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून त्यांच्या कामाचा सपाटा सुरू आहे. पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न आ. तांबेंनी उपस्थित केले होते. नाशिक विभागातील सर्व थकीत देयकांसाठी आ. तांबे यांनी सातत्याने शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक) या सर्व वेतन अधिक्षक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन ३१ मार्च २०२४ अखेर एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही, याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक १०५ कोटी, अहमदनगर ५० कोटी, जळगाव १६५ कोटी, धुळे ३३ कोटी आणि नंदुरबार १४ कोटी याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांमुळे सर्व थकीत देयके आता निकाली निघणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील ८४२ शिक्षकांचे शालार्थ चौकशी, संस्था अंतर्गत वाद व इतर कारणांमुळे ज्यांचे नियमित वेतन सुरू आहे, अशा शिक्षकांची चौकशी लावून थकीत देयके शिक्षण संचालक (माध्यमिक) यांनी थांबवली आहे. अशा शिक्षकांचे थकीत देयके देणे गरजेचे आहे. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते.
त्यामुळे उपलब्ध निधीचे योग्य प्रकारे नियोजन करून एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वेतन अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार यांनी केलेल्या मागणीनुसार निधी वितरित करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांकडे केली होती.
वेतन पथक कार्यालयात थकीत वेतनाची देयके, रजा रोखीकरणाची देयके, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. काही देयके शाळांना परत करण्यात आली आहेत. परंतु, आमदार सत्यजीत तांबे यांनी थकीत देयकेबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्याच बरोबर शैक्षणिक विभागातील रखडलेल्या कामांना गती मिळेल, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.