नागपूर / नगर सह्याद्री :
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात प्रचार सुरु आहे. अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी खळबळ जनक विधान केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजप मध्ये चांगलीच जुपली आहे.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कसाब आणि उज्ज्वल निकम यांच्याबाबत दावा केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे नेते पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत, असं बावनकुळे म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसवर दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळल्याचा आरोप केला.
बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, “विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. वडेट्टीवार यांच्या नव्या ‘जावईशोध’ नुसार, शहीद हेमंत करकरे यांच्यावर झाडलेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. असेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळेंनी लिहिले की, “मोदीजी सत्तेत आल्यापासून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे, पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं. आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.