spot_img
अहमदनगरहेडमास्तरनं का बरं धुतलं मास्तरचं पोरगं?

हेडमास्तरनं का बरं धुतलं मास्तरचं पोरगं?

spot_img

साडेचार वर्षांतील सत्तेची फळं चाखली | संधिसाधू भूमिका घेत विरोधात भूमिका घेणारे लंके मतदारांआधी अजित पवारांकडून क्लीनबोल्ड

सारिपाट / शिवाजी शिर्के

आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीत धनंजय मुंडे जसे सहभागी होते तसेच नीलेश लंके देखील! अजित पवार यांच्या लगारीला लागून साडेचार वर्षे सत्तेत राहताना शेवटच्या दोन वर्षात महायुतीचा घटक म्हणून सत्तेचा फायदा लंके यांनी उठवला. हा फायदा उठवत शेवटच्या क्षणी लंके हे महिना- दीड महिन्यापूर्वी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आले. आधी शरद पवारांना दैवत मानले आणि अजित पवार यांची साथ सोडली. नंतर अजित पवार यांना दैवत मानले आणि शरद पवार यांची साथ सोडली. नंतर अजित पवार यांची साथ सोडली आणि शरद पवार यांच्या सोबत गेले. अजित पवार यांची नीलेश लंके यांनी साथ सोडल्यानंतर राज्यात मोठा धमाका उडाला. अजित पवार यांची साथ सोडणं वाटतं तितकं सोप्प नव्हतं! पण, ते धाडस लंके यांनी केले. त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागणार हे नक्की! अजित पवार हे सुजय विखे यांचा अर्ज दाखल करण्यास येणार असल्याचे सांगितले जात असताना तांत्रिक कारणाने ते येऊ शकले नाही. त्याची लागलीच उलटी चर्चा लंके समर्थकांनी केली. लंके यांच्यावर असणार्‍या प्रेमापोटी अजितदादा आले नाहीत आणि अजितदादा हे लंके यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाहीत अशी चर्चा लंके यांच्या समर्थकांनी केली.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास काही तासांचा अवधी बाकी असताना अजित पवार हे कर्जतमार्गे पारनेरला आले. पारनेरला आलेले अजितदादा नीलेश लंके यांच्या विरोधात बोलणार नाही असा कयास लंके समर्थकांकडून लावला जात होता. मात्र, अजितदादा हे अजितदादा आहेत आणि त्यांना नीलेश लंके यांचा किती राग आहे हे कालच्या जाहीर सभेतून स्पष्टपणे दिसून आले. ‘नीलेश बेट्या’, या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. तुझी दादागिरी आणि गुंडगीरी माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देणारी ठरली तर तुझा बंदोबस्त करतो, आणि याला लोकसभेला पाडाच असा थेट दादा स्टाईल आदेशच त्यांनी दिला. अजित पवार हे लंके यांच्या विरोधात बोलत असताना त्यांच्या प्रत्येक शब्दाला आणि वाक्याला पारेनरच्या व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर टाळ्या- शिट्ट्यांचा पाऊस पडत होता.

शाळेचा हेडमास्तर आपण असल्याचे अजित पवार यांनी म्हणताच विखे समर्थकांसह नीलेश लंके यांच्याकडून दुखावल्या गेलेल्यांनी संपूर्ण सभास्थळ अक्षरक्ष: डोक्यावर घेतले. याला मी तिकीट दिलं आणि निवडून आणलं असं सांगत अजित पवार यांनी आपली मोठी चूक झाल्याचे मान्य केले. खरं तर गेल्या दीड- दोन वर्षापासून नीलेश लंके हे अजित पवार यांना सोडणार आणि विरोधात लढणार हे भाकीत ‘नगर सह्याद्री’च्या माध्यमातून आम्ही मांडत आलो. गेल्या सहा- सात महिन्यात लंके हे अजित पवार यांच्या नाकावर टिच्चून विरोधात जाणार हेही आम्हीच मांडले होते.

अजित पवार यांना सोडचिठ्ठी देणार पहिला आमदार नीलेश लंके असणार हेही आम्हीच मांडले. मात्र, त्या-त्यावेळी दादा, मी तुम्हाला सोडणार नाही असं सोंग लंके यांच्याकडून घेतले जायचे! समर्थन देणार्‍या आमदारांना जपण्याचा आणि त्यांची कामे मार्गी लावण्याचा स्थायीभाव अजित पवार यांचा आहे. त्याचाच गैरफायदा उठवत नीलेश लंके यांनी त्यांची अनेक कामे मार्गी लावली. यातील बहुतांश कामे ही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची! त्यात जनहिताची टक्केवारी किती होते हे अजित पवार आता लोकसभेतील सुजय विखे यांच्या विजयी सभेत सांगतील असे आतापासूनच सांगितले जात आहे.

विजयबापू शिवतारे यांच्यानंतर सर्वाधिक रोषाचे धनी नीलेश लंके!
अजित पवार हेच खर्‍या अर्थाने अजित पवार यांचे हेडमास्तर राहिलेत! म्हणूनच कालच्या सभेत अजित पवार यांनी तुझा हेडमास्तर मीच असल्याचे ठणकावून सांगितले आणि तुला नीट केल्याशिवाय मी शांत बसत नसतो हेही! ‘कंड’ हा अजित पवार यांचा परवलीचा शब्द! कंड जिरवणे म्हणजे काय हे त्यांनी पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे यांना दाखवून दिले. ‘तू पुन्हा विधानसभेला निवडून कसा येतो हेच बघतो, असे जाहीर आव्हान देणार्‍या अजित पवार यांनी विजयबापू शिवतारे यांना चारीमुंड्या चितपट करून दाखवून दिले. काल पारनेरमध्ये येऊन त्यांनी तोच परवलीचा शब्द नीलेश लंके यांच्यासाठी वापरला! ‘नीलेश बेट्या, बघतोच आत्ता, तू ज्या शाळेत शिकलास त्या शाळेचा हेडमास्तर मी आहेस हे तू विसरलास! याला लोकसभेला पाडा! त्याच्या गुंडगिरीला घाबरु नका! त्याच्याकडून त्रास झाला तर थेट माझ्याकडे या, त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे मी बघतो हे सांगायला देखील अजित पवार विसरले नाहीत! याचाच अर्थ नीलेश लंके यांनी दिलेला धोका अजित पवार यांच्या खूपच जिव्हारी लागलाय! राज्यातील एकाही आमदारात अजित पवार यांना सोडण्याची हिम्मत झाली नाही! नीलेश लंके यांनी अजित पवार यांना अक्षरक्ष: कोलले! आता त्या कोलल्याची किंमत काय असते हे अजित पवार लंके यांना दाखवून द्यायला सज्ज झाले आहेत! विजयबापू शिवतारे यांच्यापेक्षाही अजित पवार यांचा रोष नीलेश लंके यांच्यावर किती मोठा आहे हे काल स्पष्टपणे समोर आले.

सामान्य जनतेचे हित जपले म्हणून त्यांना जनतेने बहाल केली लोकनेते ही पदवी; यांना कोणी दिली?
नगर शहरासह जिल्ह्याला एक वैचारिक बैठक आहे. स्व. विठ्ठलराव विखे पाटील, स्व. भाऊसाहेब थोरात, स्व. मारुतराव घुले पाटील, स्व. शंकरराव काळे, स्व. शंकरराव कोल्हे, स्व. बाबुराव तनपुरे, स्व. शिवाजीराव नागवडे अशा अनेक दिग्गजांना जिल्ह्याने जवळून पाहिले. त्यांचे काम अनुभवले! खर्‍या अर्थाने या सर्वांचा जनतेला आधार वाटायचा! अलिकडच्या काही वर्षात त्यात स्व. बाळासाहेब विखे पाटील, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, अप्पासाहेब राजळे यांची राजकीय बैठक वेगवेगळ्या विचारांची असली तरी त्यांचे जिल्ह्यासाठीचे योगदान सर्वश्रूत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात लढलेल्या स्व. बबनराव ढाकणे यांचा लढा तर गौरवास्पदच! म्हणूनच या सार्‍यांच्या नावाचा वेगळा दबदबा राज्याच्या राजकारणात कायम राहिला. यातील बहुतेकांना लोकनेते म्हणून त्या- त्या भागातील जनतेने संबोधले! त्याचे कारण त्यांनी जपलेली सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी! आता अलिकडे दोन- चार वर्षात काहींच्या नावापुढे एका रात्रीतून लोकनेते ही उपाधी आली! ती कोणी दिली याहीपेक्षा एकतर रात्रीतून लोकनेता उपाधी मिळालेल्यांचं काम मोठं की त्याआधी वर नामोल्लेख झालेल्यांचे याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...