जिल्ह्याच्या राजकीय समिकरणात बदलाचे संकेत | श्रीगोंद्यातील जनतेकडून कर्डिलेंच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत
सुनील चोभे | नगर सह्याद्री
अहमदनगर भाजपचे नेते तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मुंबईत जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कर्डिले यांनी घेतलेल्या भेटीत नक्की काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसह येणार्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाल्याचा कयास बांधला जात आहे. दरम्यान, कर्डिले यांनी श्रीगोंद्यातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी श्रीगोंद्यातूनच जोर धरत असताना पवार- कर्डिले यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उठण्यास सुरुवात झाली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या उमेदवारांनी विविध पक्षांकडून चाचपणी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून भूमिका बजावणारे भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राहुरी की श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक लढवतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गत विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांनी राहुरीमधून निवडणूक लढवली होती. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही कर्डिले यांची राहुरी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांशी नाळ टिकून आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राहुरी मतदारसंघातून तयारी चालविली आहे. लोकसभा निवडणुकीतही राहुरी विधानसभा मतदारसंघाची व नगर तालुक्याची जबाबदारी कर्डिले यांनी यशस्वीपणे पार पाडली असल्याचे मिळालेल्या मताधिक्यावरुन दिसून येत आहे.
गत श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बबनराव पाचपुते निवडून आले. परंतु निवडणुकीनंतर पाचपुते यांनी नगर तालुक्यातील जोडलेल्या गावांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. गेल्या दहा वर्षात श्रीगोंदा मतदारसंघात गेलेल्या नगर तालुक्यातील गावांकडे श्रीगोंद्यातील पुढार्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या गावांमधून श्रीगोद्यामध्ये शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
पाचपुतेंच्या चिंतन बैठकीला विखे समर्थक कार्यकर्त्यांची दांडी
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून मताधिय कमी झाल्याने भाजप आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेतली. या बैठकीकडे विखे समर्थक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातून महायुतीचे घटलेले मताधिय हा बैठकीचा मुख्य विषय होता. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार पाचपुते यांच्यासमोर त्यांचे पुत्र विक्रमसिंह आणि प्रतापसिंह पाचपुते यांचे कान टोचले. तुम्हा भावांचा संपर्क कमी पडत आहेत. लोकांचे फोन उचलत नाही. आगामी विजयासाठी तुम्हा भावांनी जमिनीवर राहून लढ्याचे नेतृत्व करावे, असे कार्यकर्त्यांनी सुनावले. दरम्यान श्रीगोंद्यातील घटलेले मताधिक्य पाचपुते यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
शिवाजी कर्डिलेंना आमदार करणार: सुजय विखे पाटील
लोकसभा निवडणुकीनंतर विळद घाट येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नका विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी सज्ज व्हावे असे सांगत एकाही कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याचे माजीमंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रामाणिकपणे आपल्या वयाचा विचार न करता माझ्या विजयासाठी खूप परिश्रम घेतले. महायुतीच्या सर्वच नेते कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम घेतले. कर्डिले यांना पुन्हा आमदार करुन माझ्यासाठी घेतलेल्या कष्टातून थोडीसा उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.