श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील तरुण शेतकरी रामदास पाचपुते यांनी जिद्द व प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या शेतात सुरुवातीला एक गाय विकत घेऊन व्यवसायाला सुरुवात केली त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्यांना या व्यवसायात आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी गायांचा गोठा करत दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली.
आज ते या व्यवसायातून महिन्याला लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील रामदास पाचपुते यांना वडिलोपार्जित चार ते पाच एकर शेती आहे. त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याची ठरविले होते. गायांचे योग्य संगोपन करण्यासाठी त्यांनी काँक्रेटचा गोठा तयार केला.
सुरवातीला त्यांचे अल्प प्रमाणात दूध होते,परंतु त्यांनी व्यवसायाला उभारा देत गायांचे योग्य संगोपन करत वाढ केली. गायांचा व्यवसाय उभारणीसाठी त्यांना एकूण १५ ते १६ लाखापर्यंत खर्च आला. या व्यवसायात रामदास पाचपुते यांच्या घरातील सर्वजन सहकार्य करतात. सकाळी ५ वाजता दूध काढण्यापासून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात होते.
गायांच्या संगोपनातून शेणखतही जमा होते. शेण खताला मागणी भरपूर असल्यामुळे १ ट्रॅक्टर ५ हजारापर्यंत विकला जातो. त्यातून त्यांना वर्षाकाठी देखील उत्पन्न मिळते. गायांच्या संगोपनासाठी लागणारा चारा म्हणजेच मका, गवत, कडबा यासाठी ते शेतात रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने संपूर्ण शेती करत आसतात.