ठिकठिकाणी कचर्याचे ढीग | संस्थेची सहा कोटींची बिले थकली
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
गेल्या वर्षभरापासून राज्यसरकारने वित्त आयोगाचे अनुदान दिलेले नाही. महापालिकेची कर वसुलीही ठप्प झाल्याने मनपाकडेही पैसे नाहीत. परिणामी, शहरात कचरा संकलन करणार्या श्रीजी एजन्सी या संस्थेची पाच महिन्यांपासून सहा कोटी रुपयांची बिले थकली आहेत.
दरम्यान, आर्थिक अडचणीमुळे काम सुरू ठेवणे शय नाही. कर्मचार्यांचे पगार थकले आहेत. गुरुवारपासून शहरातील कचरा संकलनाचे काम बंद करण्यात आल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. दरम्यान शहरात सध्या ८० गाड्यांव्दारे घरोघरी, हॉटेलमधून, कचरा कुंड्यांमधून कचरा संकलन केले जाते.
जानेवारी ते मे महिन्याच्या कामांची बिले थकली आहेत. अद्यापही सहा कोटींची बिले थकीत असल्याने कचरा संकलन व्यवस्थेवर, कर्मचार्यांच्या पगारावर होणारा दैनंदिन खर्च होऊ शकत नाही. बँकांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे १० जून रोजी कर्मचार्यांनी काम बंद केले होते. त्यांची समजूत काढून काम सुरू केले आहे.
मात्र, तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास शहरातील सर्व कचरा संकलन सेवा बंद पडेल, असे श्री जी एजन्सीच्यावतीने मनपाला कळवण्यात आले होते. संबंधित संस्थेकडून गुरुवारपासून कचरा संकलन करणे बंद करण्यात आले होते. दरम्यान, मनपाकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरात कचरा संकलन ठप्प होऊन कचरा कोंडी होण्याची शयता आहे.