अमरावती : नगर सह्याद्री
महाराष्ट्रात सध्या महावितरणच्या वतीने घरोघरी जाऊन प्रीपेड मीटर लावण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे मीटर म्हणजे मोबाईल रिचार्ज प्रमाणे ग्राहकांची लूट करणारे आहे. वीज प्रीपेड मीटरमध्ये भविष्यात २८ दिवसांचा प्लॅन असेल. त्या माध्यमातून वर्षाला १२ ऐवजी १३ महिने कंत्राटदार वीज ग्राहकांकडून वसुली करतील, असा खळबळ जनक दावा काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महावितरणच्या वतीने प्रीपेड वीज मीटर लावण्याचा धडाका सुरू झालेला आहे. या मीटरचे अनेक फायदे सांगितले जात आहेत. तरी पहिल्याच टप्प्यात मीटर रिडींग घेणारे हजारो हात बेरोजगार होणार असल्याने राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. वीज ग्राहकांना हे मीटर सक्तीचे करू नये यासाठी अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावला आहे.
रिवेम्प्ड डिस्ट्रीब्यूशन सेक्टर स्कीम (आरडीएसएस) अंतर्गत हे प्रीपेड वीज लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रीपेड मीटर चे अनेक धोके असल्याचे तज्ञांचे मत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख महाराष्ट्र टाईम सोबत बोलताना म्हणाले की, प्रीपेड वीज मीटर म्हणजे ग्राहकांची शुद्ध लूट आहे. खाजगी कंपन्यांसोबत हात मिळवणी करून सरकारमधले लोक चंदा दो धंदा लो या तत्त्वावर काम करत आहे.
ज्याप्रमाणे मोबाईल कंपन्या २८ दिवसांचा रिचार्ज देतात. त्याचप्रमाणे हे प्रीपेड मीटर सुद्धा भविष्यात काम करणार आहे. वीज मीटर आणि मोबाईल बिलच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्यांच्या आयुष्यात दुष्काळात १३ महिने दाखल केला आहे म्हणजे वर्षाला ३६५ दिवस. मात्र, आता २८ दिवसांच्या हिशोबाने १२ महिन्याचे ३३६ दिवस होतील. दरवर्षी २९ दिवसांचे अतिरिक्त पैसे या कंत्राटदार कंपन्या वसूल करतील.