अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगरच्या रेल्वे स्टेशन वरून एका ११ महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाले. या अपहरण प्रकरणी पोलिसानी तिघांना अटक केली असून बाळाची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे एक महिला व २ पुरुष अशा तिघांनी अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अधिक माहिती अशी: दि. १६ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अहमदनगर रेल्वे स्टेशन मेनगेट परिसरातील एटीएम कॅबीनच्या समोरील लिंबाच्या झाडाखालून फिर्यादी अमृता आकाश खडसे (वय २३, रा. मु. पो. तोंडगाव ता. जि. वाशिम) हिच्या जवळ एक अनोळखी महीला (वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे) आली तिने फिर्यादी यांचे जवळ येवून तीचेशी ओळख वाढवून त्यांचेजवळील ११ महीन्याचे त्यांचे बाळ स्वानंद आकाश खडसे यांस स्टेशन बाहेरून जेवणाकरीता वरण भात घेवून येते अशी बतावणी करून बाळास पळवून नेले होते.
सदर अनोळखी महीला बाळास घेवून परत आलीच नाही म्हणुन बाळाचे आईने अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने त्या अनोळखी महिले विरोधात भा.दं.वि. कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक संजय लोणकर हे करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा केलेले आरोपी हे सुपा परिसरात आहेत.
ही माहीती मिळाल्याने शिताफीने त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपी अनिल अशोक जाधव (वय ४१, रा. अमित मोटर्स पाठीमागे, सुपा, ता. पारनेर), नवनाथ विष्णु धोत्रे (वय ३३, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), शालन अनिल जाधव (वय ३८, रा. अमित मोटर्स पाठीमागे, सुपा, ता. पारनेर) यांना अटक करण्यात आली असून अपहरण केलेले बालक स्वानंद आकाश खडसे याची त्यांचे तावडीतून सुटका करण्यात आली आहे.