निघोज। नगर सहयाद्री
निघोज, शिरापूर, देवीभोयरे तसेच टाकळी हाजी ता. शिरुर परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत ड्रोन कॅमेरे उडताना दिसत आहे, मात्र या डोन्सची भानगड काय आहे, यातून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जिल्हाधिकारी व संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन जनतेला या बाबत प्रबोधन करुन भिती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
रात्री दहा नंतर चार ते पाच ड्रोन कॅमेरे उडताना पाहिले असल्याची माहिती शिरापूर येथील अंकुश वडने यांनी दिली. तसेच टाकळी हाजी येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषाताई बारहाते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की बुधवार दि. २६ रोजी रात्री दहा वाजता ड्रोन सदृष उपकरणे आकाशात घिरट्या घालताना दिसले असून हे उपकरणे निघोज तसेच शेजारील गावातून येत असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.
याबाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ काळजी घेऊन जनतेच्या मनातील भिती नाहीशी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जनतेतून करण्यात आले आहे.