अहमदनगर | नगर सह्याद्री:-
राज्यात गाजत असणार्या नगर मधील अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुपारी घेतल्याच्या रागातून धिंड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काहींच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप धिंड प्रकरणातील आरोपींनी केला होता. याबाबत काळे यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे आणि गंभीर आरोप केले आहेत.
मी कुणाची सुपारी दिली नसून विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून रिंगणात दिसू नये म्हणून माझ्याच हत्येचा कट शिजवला जात असल्याचा संशय आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदी उपस्थित होते. काळे म्हणाले, यापूर्वी माझ्यावर खोटा विनयभंग, खोटी हाफ मर्डर केस, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याचा आटापिटा विरोधकांचा सुरु असून सुपारी देऊन हत्या करण्याचा कट रचला जात आहे.
धिंड प्रकरणात माझा काडीचाही संबंध नसून पोलिस प्रशासनाने माझे कॉल डिटेल्स तपासावेत. या प्रकरणात माझ्या नावाचा गैरवापर करत कोणी तीस लाखांची सुपारी दिली? कधी, कुठे दिली? यासाठी कुठला अॅडव्हान्स दिला गेला आहे का? तो कोणी फायनान्स केला? त्याडव्हान्स मधून रीवॉलव्हर घेण्यात आली आहे का? असेल तर कुठून घेतले आहे? कोण अवैद्य हत्यारांचा पुरवठा करत आहे? या सगळ्यांचा पोलिसांनी तपास करावा. यासाठी ताब्यात असणारे, फरार झालेले दोन्ही गटांचे आरोपी यांचे सीडीआर, एसडीआर, टॉवर लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग काढण्यात याव्यात. यांनी कुणाची भेट घेतली, ते कोणा कोणाच्या संपर्कात आहेत.
ते ज्यांच्या संपर्कात आहेत ते अन्य कोणाच्या संपर्कात आहेत, या सगळ्याचा धागा दोरा शोधून काढून खर्या मास्टरमाईंड पर्यंत पोलीसांनी पोहोचावे आणि संभाव्य हत्याकांड घडू नये यासाठी सखोल तपास करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने काळे यांनी केली आहे. आरोपींवर पोस्को, जीवे मारण्याचा प्रयत्न ही कलमे का लावली गेली नाहीत असा सवालही काळे यांनी केला. दरम्यान, धिड प्रकरणातील आरोपींची सव्वा तासांची धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्या क्लिपच्या अनुषंगाने तपास करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
गीतेचा हकालपट्टीचा प्रस्ताव पक्षाला पाठवला
प्रवीण गीते हा शहर युवक काँग्रेसचा प्रवक्ता आणि युवक काँग्रेस क्रीडा विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. तशी नियुक्ती त्याची युवक जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यापूर्वीच गीतेच्या हकालपट्टीचा प्रस्ताव पक्षाला पाठविला आहे. त्यावर लवकरच कारवाई होणे अपेक्षित आहे. गीते काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी तो राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याचा कार्यकर्ता होता.