जामखेड । नगर सहयाद्री-
तालुक्यात जुन महीन्यात २१० मि.मी. सरासरी पाऊस पडला. पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांनी ९५ टक्के पेरण्या उरकल्या आहे. अधुन मधुन येणाऱ्या पावसाने पिके उगवली असून काही ठिकाणी खुरपणी चालू आहे. ४ जुन ते २८ जुन दरम्यान १५ दिवस पाऊस झाला. समाधानकारक व वेळेत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी नगदी पिक असलेले उडीद, सोयाबीनला पसंती दिली असून ती रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. दमदार पावसामुळे बांधखडक वगळता तालुक्यातील सर्व टॅंकर बंद झाले आहे. जुन महीन्याची पावसाची सरासरी १३३ मि.मी. आहे. यावर्षी मात्र २१० मि.मी पाऊस झाला आहे.
जामखेड तालुक्यात ४ जुन रोजी पावसाचे आगमन झाले. पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेले उडीद सोयाबीनला जास्त पसंती दिली. तालुक्यात खरीपासाठी ५६ हजार हेक्टर क्षेत्र होते त्यापैकी ५३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त उडीद २१४२० हेक्टर, सोयाबीन १७२८२ हेक्टर, तुर ६६३१ हेक्टर, कापूस ४५९२ हेक्टर, बाजरी २७५९ हेक्टर, मका १०४५ हेक्टर व कडधान्य ७० हेक्टर अशी ९५ टक्के पेरणी झाली आहे.
जामखेड तालुक्यात लवकर पेरण्या झाल्या यामुळे खुरपणी तयारी चालू असून कोळपे वापर चालू आहे. तर काही ठिकाणी पिकाची उगवण झाली. तसेच अधूनमधून येणारा पावसाच्या झपक्याने पिकांना बळ मिळाले आहे. नान्नज जवळा परिसरात ओढे नदीनाले यांना पाणी आले आहे व विहीरी बोअरला पाणी वाढले आहे. तालुक्यात इतरत्र पाणीसाठा झाला नाही पण विहीरींना पाणी वाढले आहे. आठ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
जामखेड तालुक्यात मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले होते. भुतवडा व रत्नापूर तलाव वगळता तालुक्यातील एकाही तलावात समाधान कारक पाणी आले नाही. परिणामी जानेवारी पासून तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. शासनाचे टॅंकर सुरू होण्यासाठी लागणारा कालावधी व जाचक अटी पाहता आ. रोहीत पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेकडून तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. जुन महीन्यात झालेल्या दमदार पावसामुळे बांधखडक वगळता सर्व टॅंकर बंद झाले आहे.