नाशिक / नगर सह्याद्री :
पुणे शहरात ‘झिका’चा रुग्ण आढळण्या आधीच नाशिकमध्ये झिकाने प्रवेश केल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका ६६ वर्षीय पुरुषाला झिकाची लागण होऊन उपचारांनंतर तो घरी परतला आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्याच्यावर पंधरा दिवस उपचार झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, सदरचा रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतरही महापालिकेने ‘झिका’बाबत माहिती दडवून ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदरचा रुग्ण अहमदनगरचा असल्यामुळे तेथील आरोग्य विभागाला कळविल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
“झिकाबाधित रुग्ण संगमनेरचा होता. त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु, उपचारांनंतर तो सुखरुप घरी परतला आहे. याबाबत अहमदनगरच्या आरोग्य विभागाला सूचना देण्यात आली होती.”
*डॉ. नितीन रावते, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मलेरिया विभाग*