एसपी कार्यालयासमोर भ्रष्टाचाराचा मडका हाती घेत आंदोलन
अहमदनगर / नगर सह्याद्री
पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने खासदार नीलेश लंके व सहकार्यांनी भ्रष्टाचाराची मडकी हाती घेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत अवगत करण्यात आले होते. परंतु, त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे २२ जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे गुरुवारी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार खा. लंके व त्यांच्या सहकर्यांनी भ्रष्टाचाराचा मडका हाती घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
आंदोलनामध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवा सेनेचे विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, योगीराज गाडे, दत्ता जाधव, आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, अॅड. राहुल झावरे, सुदाम पवार, प्रकाश पोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
खा. लंके यांनी ११ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे व इरत कर्मचारी हे राजरोसपणे हप्ते घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळया असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला आहे. आहेर यांच्याकडे दोन्ही शाचखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप खा. लंके यांनी पत्रात केला आहे. हप्ते गोळा करणार्यांवर पोलीस कर्मचार्यांवर ठोस कारवाई न झाल्यान खा. लंके यांनी उपोषण सुरु केले आहे.
भ्रष्टाचाराचा पापाचा मडका भरला
आज आम्ही प्रातिनिधिक मडकी फोडतोय. भ्रष्टाचाराचा पापाचा मडका आता भरलेला आहे. आजपासून ते फोडायला आम्ही सुरुवात करतोय. या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत आहे. कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही. याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांनी दिला.