अहमदनगर।नगर सह्याद्री
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नगर दौर्यावर आहेत. पारनेर, नगर, श्रीगोंदा, कर्जत ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. नगर शहरातील सावेडी येथे महिला मेळावा झाला. यावेळी अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केले. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, लाडकी बहीण योजना कायमची सुरू ठेवतो असे पवार यांनी सांगितले.
सावेडी येथे महिला मेळाव्यात महिलांसोबत संवाद साधताना विविध विषयावर रोखठोक भाष्य केले. या कार्यक्रमाला कृषिमंत्री धनजय मुंडेे, मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुणकाका जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले, सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील. त्यामुळे काळजी करू नका. ज्या गरीब मायमाउली आहेत, त्यांच्या काही गरजा भागविण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली. सर्व घटकांतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
तसेच शेतकर्यांना देखील वीज मोफत देणार असून सौर प्रकल्पासाठी सुद्धा आता अनुदान देणार आहे. तसेच महिला बचत गटांना ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहोत. राज्यातील महिलांना पिंक कलरची तीन चाकी रिक्षा आम्ही देत आहोत. या योजनेमध्ये नगर जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात देखील ३०० रिक्षा या महिलांना देणार आहोत. या संदर्भात राज्य सरकार महिलांना अनुदान देणार आहे.
दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी राज्यातील २५ लाख रिक्षा चालकांच्या संदर्भात निवेदन दिले होते. रिक्षा चालकांच्या परवाना शुल्क दंंड संदर्भात देखील राज्य सरकार गंभीर आहे. रिक्षा चालकांना होणार दंड देखील रद्द करण्यासंदर्भात विचार करत असल्याचे पवार यांनी सांगितले.