उपमुख्यमंत्री अजित पवार | पारनेर येथे साधला महिलांशी संवाद
पारनेर/प्रतिनिधी :
सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना मी बंद होऊ देणार नाही परंतु, याकरिता तुम्हालाही काही जबाबदारी घ्यावी लगणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचे बटन दाबले तरच ही योजना पुढे चालू राहणार आहे. दुसरे सरकार आले तर योजना बंद करतील. मग लाडकी बहीण योजनेचा काय उपयोग असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांना केला. दरम्यान येत्या रक्षाबंधनच्या दिवशी पहिले दोन हप्ते दिले जाणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात पारनेर येथे महिलामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी कृषी मंत्री धनजय मुंढे, मंत्री अदिती तटकरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, माजी मंत्री अशोकराव सावंत, राष्ट्रवादीचे नेते रविंद्र पगार, कपिल पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या संध्या सोनवणे, भाजप कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, काशीनाथ दाते, वसंत चेडे, भाजप तालुकाध्यक्ष राहूल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, सचिन पाटील वराळ, महिला तालुका अध्यक्षा सुषमा रावडे, मयुरी औटी, योगिता औटी, दत्तात्रय पानसरे, सुभाष दुधाडे, शिवसेना पारनेर तालुका प्रमुख विकास रोहकले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकारी व महिला मोठ्या संख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना पवार म्हणाले, ज्या महिला योजने पासून काही कागदपत्रांमुळे दूर जाणार आहे. त्यावर तोडगा काढून प्रत्येकीला लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठीच महिलांना सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय योजना या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जात आहेत. मी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे. वाढदिवसाच्या औचित्य साधून आज माय माऊलींना भेटायचे असे मी ठरवले. त्यामुळे मी पारनेर या ठिकाणी आलो आहे. महिलांसाठी यावर्षीच्या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली असून त्यामुळे राज्याचे बजेट सादर करत असताना वेगळा आनंद मिळाला आहे. राज्याच्या बजेटमध्ये शेतकर्यांना सुद्धा महत्त्वपूर्ण योजना आम्ही आणल्या असल्याचे पवार म्हणाले.
माझी लाडकी बहीण योजना ही जातीपातीला गृहीत धरून सुरू केलेली नाही. ही योजना सर्व गोरगरीब महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. योजनेचा लाभ घेत असताना महिलांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फॉर्म भरला तरी जुलै पासून ऑगस्टचे पैसे आम्ही खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही. खर्या अर्थाने सर्व घटकातील महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकार अनेक योजना महिलांसाठी राबवत आहे. विरोधक आमच्यावर टीका करतात. म्हणतात की हा चुनावी जुमला आहे. पण तसे नाही. सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना आम्ही अभ्यास करून आणल्या आहेत. मग पूर्वीचे जे राज्यकर्ते होते. त्यांनी या योजना का नाही आणल्या. माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्यासाठी बहिणीकडून एक रुपयाही आम्ही घेत नाही. त्यासाठी वेगळे पैसे आम्ही फॉर्म भरून देणार्याला देत आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे माझी लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्याची जबाबदारी आमच्या सरकारने घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.
शेतकर्यांसाठी वीज मोफत देणार असून सौर प्रकल्पासाठी सुद्धा आता अनुदान देणार आहे. तसेच महिला बचत गटांना तीस हजार रुपयापर्यंत अनुदान देत आहे तसेच महिलांना पिंक कलरची तीन चाकी रिक्षा आम्ही देत आहोत. या योजना कधीही बंद होणार नाही हा अजित दादाचा वादा आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला पारनेर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद होता. यावेळी अजित पवार यांनी महिलांना अनेक प्रश्न विचारले व महिलांच्या समस्या व प्रश्नांची निराकरण त्यांनी स्वतः उत्तरे देत केले. या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद होता ३००० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पारनेर येथे यशस्वी झाला.
माझे खरे गुरू अजित पवारचं
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरू आहेत. मात्र, माझे खरे गुरू उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत. अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला. गुरू आणि मोठे बंधू म्हणून अजित दादांनी मला इथपर्यंत पोहचवले, अशी भावना मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
महायुतीतील कोणीही स्वबळावर लढणार नाही
भाजपच्या स्वबळाच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे. महायुतीतील कोणताही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवणार नाही. आम्ही एकत्र लढणार यात तीळमात्र शंका नाही. भाजप त्यांच्या जागांसंदर्भात निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिली.