अहमदनगर । नगर सहयाद्री:-
एसबीआय बँकेत गहाण ठेवलेले नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने सोडून आणल्यानंतर ते चोरीला गेल्याची घटना सावेडी उपनगरातील शिवनगर कॉलनीमध्ये घडली. या प्रकरणी मिना बाळासाहेब पालवे (वय 48 रा. शिवनगर कॉलनी, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या कॉलनीतील सुदाम पवार या व्यक्तीवर दागिने चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिना यांनी त्यांच्याकडील नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने गुलमोहर रस्त्यावरील एसबीआय बँकेत गहाण ठेऊन त्यावर तीन लाख रूपये घेतले होते. दरम्यान ते दागिने सोडून आणण्यासाठी मिना मंगळवारी (23 जुलै) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पैसे घेऊन एसबीआय बँकेच्या गुलमोहर शाखेत गेल्या होत्या. त्यांनी पैसे भरून दागिने सोडले व ते पर्समध्ये ठेवले. पर्स दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन त्या शिवनगर कॉलनी येथील सुदाम याच्या घरी आल्या होत्या. त्यांनी एक वर्षापूर्वी सुदामला 10 हजार रूपये हातउसणे दिले होते. ते पैसे घेण्यासाठी मिना त्याच्या घरी गेल्या होत्या.
त्यांनी सुदामच्या घरात जाताना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली नऊ तोळ्याच्या दागिन्याची पर्स सोबत नेली होती व ती पलंगावर ठेवली होती. दरम्यान सुदाम सोबत बोलणे झाल्यानंतर मिना या पर्स घेऊन तेथून निघाल्या व घरी गेल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडी दिसली. त्यांनी दागिने पाहिले असता त्यामध्ये नऊ तोळ्याचे दागिने मिळून आले नाही. सुदाम पवार याच्या घरामध्ये पलंगावर पर्स ठेवली होती व तो त्या पर्सच्या बाजूने बसलेला असल्याने त्यानेच पर्समधून नऊ तोळ्याचे दागिने चोरी केल्याचा संशय असल्याचे मिना पालवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रदीप बडे करत आहेत.