अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना भागातील शितळादेवी मंदिर, बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मी माता मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी झाली होती. देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शनानंतर निसर्गाच्या सानिध्यातील सहभोजनाने सण साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी सणाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते.
बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मी माता मंदिर परिसरात गर्दी झाली होती. नागरिक दर्शनासाठी येथे येत होते. महिला भाविक डोयावर कलश व हातात नैवेद्याचे ताट घेऊन येत होत्या. देवीला अभिषेक व नैवेद्य अर्पण करण्यासाठी मंदिराबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सहभोजन करण्यात आले. मंदिराजवळील मोकळ्या परिसरात भाविकांनी भोजन केले.
तोफखाना परिसरातील शितळादेवी मंदिरातही गर्दी झाली होती. सणानिमित्त मंदिराचा परिसर सुशोभीत करण्यात आला होता. भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पद्मशाली समाजबांधवांना सणाच्या शुभेच्छा देणार्या फलकांची या भागात गर्दी झाली होती. समाजबांधव एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत होते. सणामुळे येथे दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. या ठिकाणी जणू यात्राच भरली होती. लहान मुलांच्या खेळण्या, सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांची येथे गर्दी झाली होती. दरम्यान, या भागात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने भाविकांसह नागरिकांचे हाल झाले. चौकात वाहतूक कोंडी होत होती. रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात होती.