निघोज । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य रेशनिंग दुकानातील ई पॉस सर्वरबाबतच्या अडचणींमुळे रेशनिंग कार्डधारक त्रस्त झाले आहेत.राज्यातील रेशनिंग दुकानातील ई पॉस मशिन सर्वरचा गेली १५ दिवसांहून अधिक काळ प्रॉब्लेम सुरु आहे.ऑनलाईन वाटप प्रक्रिया असल्याकारणाने ऑफलाईन धान्य वाटप करता येत नाही,असे दुकानदारांकडून बोलले जात आहे.
मशिन बंद असल्याकारणाने कार्डधारक वारंवार रेशनिंग दुकानात हेलपाटे मारुन वैतागले असून कार्डधारक आणि दुकानदार यांचा वाद निर्माण होत आहे.सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कार्डधारक दुकानासमोर पावसात रांगेत उभे राहतात परंतु सर्वरचा कारणामुळे पुन्हा घरी जावे लागते,काही महिला शेतातील काम बुडवून धान्य नेण्यासाठी येताहेत परंतु या कारणामुळे “ना धान्य ना कामाचा रोज” यामुळे निराश होत आहेत.
आता जुलै महिन्याचे शेवटचे दोन दिवस उरलेले आहे जर दोन दिवसात सर्वर चालू झाला नाही तर या महिन्यातील धान्याला मुकावे लागेल अशी चर्चा कार्ड धारकाकडून होत आहे.सर्वरमुळे दुकानदार दुकान उघडत नाही, दुकान उघडले तर कार्डधारक कंटाळत उभे राहतात,लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने धान्याचे वाटप करावे अशी मागणी रेशनिंग कार्डधारकांकडून केली जात आहे.
सर्वरमुळे रेशनिंग कार्डधारक त्रस्त झाले असून याबाबत पारनेरचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे शिवाय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून ही सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे राज्य सरकार मोठ्या प्रमाणात योजना राबवीत असून सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गोरगरीब जनतेला वेळेवळ धान्य मिळत नाही.
ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून असाच प्रकार सातत्याने सुरू राहीला तर गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या यंत्रणेवर राज्य सरकारचा अंकुश राहिला नाही असेच यातून सिद्ध होत आहे. तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चुली मांडून धान्याची मागणी करणारे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा पारनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडू भुकन व पदाधिकारी व सदस्य यांनी दिला आहे.