शिक्षक बँकेत बंडाचा झेंडा घेणार्यांना त्यांच्याच चेल्यांनी याआधीही दिली होती गुरुदक्षिणा!
सारिपाट | शिवाजी शिर्के:-
प्राथमिक शिक्षक बँकेत बंडखोरी झाली आणि बापूसाहेब तांबे यांचे आदेश झिडकारुन संचालकांनी नवा अध्यक्ष निवडला. बँक निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले असतानाही तांबे यांच्या विरोधात संचालक गेल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. हे होणारच होते. जे पेरले तेच उगवणार! तेच झाले. इतिहासाची पाने चाळली तर द. मा. ठुबे, विष्णूपंत खांदवे, सुभाष खोबरे, आबा जगताप, रावसाहेब रोहोकले या सार्यांच्या गोटात राहून त्यांच्यावर कुरघोड्या करत, त्यांचेच डाव त्यांच्यावर टाकत सत्ता मिळविणारे बापू तांबे हे त्यांनीच निवडून आणलेल्या संचालकांनी टाकलेल्या डावात चितपट झाले! पडद्याआड प्रवीण ठुबे राहिले असले तरी सुरेश निवडुंगे, राजू साळवे हे गुरुमाऊलीतील बंडाचे मोठे शिल्पकार ठरले! हकालपट्टीच्या बातम्या येऊ लागल्या असताना तसा अधिकार नक्की कोणाला हाही प्रश्न आहेच! याशिवाय रावसाहेब रोहोकले यांचे गुरुमाऊली मंडळ खरे की बापू तांबे यांचे या प्रश्नाचे उत्तर सभासद शोधत असताना सुरेश निवडुंगे यांनीच मंडळावर ताबा मिळवून टाकलाय! त्यामुळे आता बापू तांबे यांचे मंडळ नक्की कोणते हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो!
राज्यातील शिक्षकांच्या बँकांपैकी नगरच्या शिक्षक बँकेचा मोठा लौकीक राहिला आहे. मोठी परंपरा असलेल्या या बँकेत नेत्यांच्या विरोधात पहिले बंड झाले ते आशा शिरसाट यांचे! शिक्षक नेते भा. दा. पाटील यांच्या विरोधात खांदवे गट गेला होता. त्यावेळी शिरसाट यांनी बंड केले. त्यानंतर ज्ञानदेव वर्पे हे बँकेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी रावसाहेब सुंबे यांनी बंड केले होते. त्यावेळी त्यांना चार मते पडली आणि पराभूत झाले होते. यानंतर बंडाची परंपरा थोडीशी खंडीत झाली. आबा जगताप २००२ मध्ये चेअरमन झाले. त्यावेळी भा. दा. पाटील यांनी नियंत्रण ठेवले आणि बंड न होता ही निवड बिनविरोध झाली.
आबासाहेब जगताप यांच्यानंतर कल्याण शिंदे अध्यक्ष झाले. त्यावेळी शिंदे हे नामधारीच राहिले. बँकेचा सर्व कारभार रावसाहेब सुंबे यांनीच पाहिला. त्यानंतर रा. वि. शिंदे बँकेचे झाले. त्यावेळीही त्यांनी नेत्यांच्या विरोधात बंड केले. यानंतर झालेल्या बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. संजय कळमकर- राजू शिंदे हे एकत्र आले आणि त्यांची सत्ता आली. संजय कळमकर यांच्याकडे सर्वच शिक्षकांनी अपेक्षा ठेवल्या आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या गटाकडे सत्ता दिली. सत्ता हाती येताच संजय कळमकर यांनी संचालक मंडळाच्या केबीन बाहेर स्वत:चा ‘रिमोट कंट्रोल’ राहिल अशी ‘केबीन’ तयार केली. कळमकर यांचा रिमोट कंट्रोल या खोलीतून सुरू झाला आणि तोच रिमोट कंट्रोल पुढे वादग्रस्त ठरला. पुढे कळमकर- शिंदे यांच्यात दोन गट झाले आणि एकमेकांना डावलले गेले. असे असतानाही पाच वर्षे याच गटाकडे बँकेची सत्ता राहिली. मात्र, अंतर्गत कुरघोड्या कायम राहिल्या. संचालकांवर दबाव टाकून काम करणे यासह कळकमर यांचा अतिहस्तक्षेप नडला.
कळमकर यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्यानंतर रावसाहेब रोहोकले हा दुसरा चेहरा सभासदांनी निवडला आणि त्यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळाला सत्ता दिली. रोहोकले यांच्या जोडीला त्यावेळी आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे हेही होतेच. बँक निवडणुकीच्या आधी रोहोकले यांनी सन २०१५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे, विजय औटी यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये गुरुमाऊली मंडळाची घोषणा केली. याच मेळाव्यात रावसाहेब रोहोकले यांनी बापू तांबे यांच्याकडे गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि तांबे यांनी रावसाहेब रोहोकले यांच्या गाडीचे सारथ्य करता- करता जिल्हाभर संपर्क वाढविला.
कळमकर यांच्या कारभारातून अपेक्षाभंग झालेल्या शिक्षकांनी त्यावेळी झालेल्या निवडणुकीत तिरंगी लढतीत गुरुमाऊलीचा पर्याय निवडला. यानंतर रावसाहेब रोहोकले यांना अध्यक्षपद दिले. स्वच्छ चेहरा अशी प्रतिमा असतानाही रोहोकले यांच्या विरोधात नाराजी वाढली. निरोप समारंभ, सेवानिवृत्तीनंतरही सत्तेचा हव्यास त्यांना नडला. यानंतर असंतोष वाढत गेला आणि जोडीने विरोधकांनी त्यांच्याविरोधात नरेटीव्ह भूमिका घेत प्रचार केला. यानंतर आबा जगताप व बापू तांबे जोडी एकत्र आली. यानंतर त्याच संचालकांमध्ये गट पडून अनाप गुरुजी अध्यक्ष झाले आणि रावसाहेब रोहोकले यांना पायउतार व्हावे लागले. अनाप अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा सात- आठ महिन्यात रोहोकले गटाचे अविनाश निंभोरे अध्यक्ष झाले. निंभोरे यांच्यानंतर पुन्हा बापू
तांबे गटाचे किसन खेमनर अध्यक्ष झाले. येथूनच बापू तांबे यांनी बँकेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती घेण्याचे ठरविले. त्यादृष्टीने हालचाली आणि पेरणी चालू केली.
बँकेची निवडणूक जाहीर झाली. सरळ लढत झाली तर आपण सत्तेत येणार नसल्याचे बापू तांबे यांनी हेरले होतेच. जडजोड- युतीच्या बैठका दाखवल्या गेल्या. मात्र, युती- तडजोड होणार नाही याची काळजीही त्याचवेळी घेतली गेली. त्यातनूच शिक्षक संघ (आबा जगताप, राजू शिंदे, इब्टा मोहळकर) यांचा एक पॅनल, संजय कळमकर आणि काही जुनी पेंन्शनचे सभासद यांचा एक पॅनल, रावसाहेब रोहोकले यांचा गुरुमाऊली आणि बापू तांबे यांचा दुसरा गुरुमाऊली हा चौथा पॅनल झाला. बापू तांबे यांना शिक्षक भारती आणि राजेंद्र निमसे यांच्या अखिल भारतीय शिक्षक संघ यांची साथ मिळाली. त्यातून मतविभाजनाची अपेक्षीत गणिते जुळून आली आणि बापू तांबे यांच्या ताब्यात बँकेची सत्ता आली. कायम सर्वच नेत्यांमध्ये राहिल्याने त्यांचे डावपेच तांबे यांनी हेरले होते आणि तोच गृहपाठ तांबे यांना बँकेची सत्ता मिळवून देण्यात कामाला आला. आबा जगताप- राजू शिंदे यांच्या शिक्षक संघाचा पॅनल लंगडाच झाला होता. हा पॅनल फक्त पडण्यासाठीच बापू तांबे यांनी उभा केला होता हे आकडेवारी पाहता स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे सदिच्छाची मते तांबे यांना मिळाली. सत्ता आल्यानंतर पंधरा दिवसात राजू शिंदे हे सदिच्छा मंडळासह ताबे यांच्यासोबत जाण्यापाठीमागे मतविभागणीत राजू शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेची बक्षिसीच म्हणावी लागेल.
बापू तांबे यांच्या मंडळाला पूर्णपणे बहुमताची सत्ता मिळाली असताना बापूच्या विरधोत लढाणारे राजू शिंदे हा बापू तांबे सोबत गेले. शिवाजीराव गट ही त्यांची ओळख. त्यातून संचालकांसह सभासदांमध्ये मोठ्या चलबिचल आणि विचलता निर्माण झाली. त्यातूनच सभासदांसह काही संचालक स्वगृही म्हणजेच सभाजीराव थोरात आणि आबासाहेब जगताप या शिक्षक संघात त्यांची घरवापसी झाली. जोडीला बापू तांबे यांच्याकडून संचालकांना मिळालली अपमानास्पद वागणूक आणि अन्य मुद्दे हे निमित्तमात्र ठरले. बापू तांबे यांची बँकेत सत्ता आल्यानंतर संजय कळमकर हे एक वर्षांपासून शिक्षक संघात आबा जगताप यांच्यासोबत आले आहेत. ते एकत्र काम करत आहेत. चार महिन्यांपूर्वी रावसाहेब रोहोकले व त्यांचा शिक्षक परिषदेत गेलेला गट शिक्षक संघात स्वगृही परत आला.
आबासाहेब जगताप- संजय कळमकर – रावसाहेब रोहोकले हे राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळख असणार्या संभाजीराव थोरात यांच्या संघटनेत एकत्र आले आहेत. पर्यायाने तांबे याच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले सर्व संचालक जगताप- कळमकर- रोहोकले यांच्याकडे आले. राज्य संघात थेट वरपर्यंत नेतृत्व सिद्ध करणे आणि नेतृत्व करण्यात शांत- संयमी म्हणून आपली ओळख कायम ठेवण्यात आबासाहेब जगताप हे यशस्वी झाले. त्यातूनच त्यांच्यावर राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी आली. आता त्यांच्याकडे राज्यातील शिक्षक त्यांच्या कुुटुंबातील सदस्य या भावनेतून पाहू लागले आहेत. संजय कळमकर यांच्याबाबत जे घडले तेच बापू तांबे यांच्याबाबत घडले असल्याने शिक्षक बँकेत जे काही झाले त्याला स्वत: बापूसाहेब तांबे हेच कारणीभूत ठरलेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.