माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केली होती तक्रार | तत्कालिन अध्यक्ष, सचिवावर फौजदारी कारवाईची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच घोसपुरी पाणी पुरवठा योजनेच्या तत्कालिन अध्यक्ष व सचिव यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराबाबतचे चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकारी स्मिता बागुल यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता (नाशिक) यांना दिले आहेत. तसेच चौकशी करून शिवाजी कर्डिले यांना त्याची माहिती कळवण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास पाठवण्याचे त्या आदेशात म्हटले आहे.
तब्बल वर्षभरानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोसपुरी पाणी पुरवठा योजनेच्या अनियमिततेची चौकशी होणार असल्याने याबाबत तर्क वितर्क लढविले जात असून चर्चेला उधाण आले आहे. घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या तत्कालिन अध्यक्ष व सचिव यांनी केलेल्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे वर्षभरापुर्वी केली होती. तत्कालीन अध्यक्ष कार्ले व सचिव भोसले यांनी दहा वर्ष मनमानी पद्धतीने कारभार केला असून योजनेत अनियमितता व भ्रष्टाचार केला आहे. १२ वर्षे कोणतेही लेखापरीक्षण केलेले नसून तक्रारीनंतर लेखापरीक्षण करण्यात आले आहे. योजनेच्या निविदा जिल्हा परिषद व शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या नाहीत. खरेदी केलेला माल व साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी न होताच देयके प्रदान करण्यात आलेली आहेत.
पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य टाकीजवळ दररोज खाजगी टँकर भरुन दिले जातात. त्यातून अध्यक्ष व सचिव लाखोंची कमाई केली. योजनेसाठी टी.सी.एल. पावडर व पाणीशुध्दीकरणासाठी वापरले जाणारे रसायने खाजगी मासेमारी करणा-या ठेकेदाराला विकली. योजनेसाठी नळाला, टाकीला लावण्याची मिटर कोणत्याही प्रकारच्या प्रचलित खरेदी पध्दतीचा अवलंब न करता करण्यात आलेले असल्याने संस्थेचा तोटा झाला आहे. त्यातून भ्रष्टाचार झाला असल्याचे भाजपा नेते कर्डिले यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन अनियमितता व भ्रष्टाराचास जबाबदार असणार्या तत्कालिन अध्यक्ष कार्ले व सचिव भोसले यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आता चौकशी करण्याचे पत्र राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकारी स्मिता बागुल यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता (नाशिक) यांना वर्षभरानंतर पाठवले आहे. कर्डीले यांनी दिलेल्या पत्रावर घोसपुरी योजनेतील लाभधारक गावांतील १५ तत्कालीन सरपंचांच्या सह्या आहेत. चौकशीमध्ये काय आढळते हे पाहणे महत्वाचे ठरणार असून याबाबत तत्कालिन अध्यक्ष संदेश कार्ले काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.