नाशिक । नगर सहयाद्री:-
लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणूक आयोगानं तयारी सुरु केली आहे, त्यप्राणे प्रत्येक पक्षानेही जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना विधानसभा निवडणुकीत जागावाटपावर भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पक्ष कोणत्या जागा लढवणार, हे ठरवण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. महायुतीमधील घटकपक्ष मागील विधानसभा निवडणुकीत (२०१९) जिंकलेल्या जागा आपल्याकडेच ठेवतील, असा प्राथमिक निर्णय झाला आहे.
एखाद्या मतदारसंघात विद्यमान आमदारापेक्षा अन्य चांगला उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल तर ती जागा सोडण्याची मानसिकता दाखवायला हवी. महायुतीत काही जागांची अदलाबदल शक्य आहे, पण अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.राज्यात सध्या एकाच पक्षाचे सरकार येणं, अशक्य असल्याचं थेट वक्तव्य अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहात एकाच पक्षाचे सरकार येणं अशक्य आहे.
चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात लाडकी बहीण योजनावरून अफवा पसरवल्या जात असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहेत.
कळवण-सुरगाणा मतदारसंघातील विविध विकासकामांना आपल्या महायुती सरकारनं तब्बल २,२०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदारसंघातील अनेक प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहेत. या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येनं माझ्या माता-भगिनींनी उपस्थिती लावली.
त्यांच्यासाठी आपण अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत.लाडकी बहीण योजनेतून सर्व पात्र माता-भगिनींच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तसंच आपल्या तरुण मुला-मुलींसाठी आपण ॲप्रेंटीस योजना देखील सुरू केलेली आहे, त्याचाही मोठा फायदा त्यांना येत्या काळात होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.