अहमदनगर । नगर सहयाद्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २० लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो नेवासा फाट्या जवळ पकडला. सदर टेम्पो सिल्वासा दादरा हवेली येथून चोरी करण्यात आला होता. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कृष्णा देवी शंकर वर्मा (वय ४०, रा. सुकापुर, नविन पनवेल, नवी मुंबई) रामबहादुर राममणी (वय ३४, रा. मेजा, जिल्हा प्रयागराज, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
३१ जुलै, २०२४ रोजी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत अहमदनगर कडून छत्रपती संभाजीनगर रोडने भरधाव वेगाने जाणाऱ्या लाल विटकरी रंगाच्या चोरी केलेल्या आयशर टेम्पोबाबत माहिती मिळाली. यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहे ज्ञानेश्वर शिंदे, पोना/संदीप दरंदले व पोकों/विशाल तनपुरे यांना टेम्पोचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
पथकाने अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर शोध सुरू केला असता, नेवासा फाटा परिसरात सदर वर्णनाचा टेम्पो उभा आढळला. पथकाने त्वरित कारवाई करत टेम्पो थांबवला आणि टेम्पो चालक व क्लिनरला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पुढील चौकशीत त्यांनी सिल्वासा दादरा हवेली येथून चोरी केल्याची कबुली दिली. कृष्णा देवी शंकर वर्मा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र, गुजरात व सिल्वासा, दादरा हवेली अशा विविध राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.