संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेर तालुक्यातील झोळे येथे घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवार (दि. ५ ऑगस्ट) सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव भिमाजी उनवणे (वय ७७) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की झोळे येथील साहेबराव उनवणे हे रात्री जेवण करुन घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असता रात्री साडेअकरा ते सकाळी सहा वाजेपूर्वी अज्ञाताने कोणत्या तरी हत्याराने डोक्याला मारुन खून केला. साहेबराव उनवणे यांची सून सकाळी बाहेर आली असता सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे धक्कादायक दृश्य कुटुंबियांनी पाहताच एकच आक्रोश झाला.
मयत वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोना. अमित महाजन आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर तपासणीसाठी तत्काळ श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच या तपासाकामी वेगवेगळ्या पथकांना देखील रवाना करण्यात आले.
याप्रकरणी खून झालेल्या वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे करत आहेत. या घटनेने झोळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.