सुपा । नगर सहयाद्री:-
शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर पारनेर तहसिलदारांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ५ ऑगस्टला तहसिलदारांना नोटीस दिली आहे. या प्रकरणांची पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना प्रशासकीय अधिकार्यांना ६० दिवसांच्या आत शिव शेतपानंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. परंतु १७ जुलै २०२३च्या हायकोर्टाच्या निकालाला १ वर्ष पूर्ण होऊनही सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.
त्यामुळे शेतकर्यांनी पुन्हा न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणावरून तहसिलदारांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. प्रतिक्षा काळे यांच्या मार्फतही याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हायकोर्टाच्या आदेशांचा आदर राखण्यासाठी अखेर तहसिलदारांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, राहुरी, नेवासा, कर्जत, श्रीरामपुर तालुक्यातील शेत रस्तेपीडित शेतकरी यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या शेतकर्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
जनजागृतीच्या माध्यमातून संघर्ष
भविष्यात शेवटच्या शेतकर्याला दर्जेदार शेतरस्ता जोपर्यंत मिळत नाही. तो पर्यंत प्रशासकीय, न्यायालयीन, जनआंदोलन, जनजागृतीच्या माध्यमातून संघर्ष सुरूच ठेवणार
-शरद पवळे (शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)