सुपा / नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे मंगळवार दि.६ रोजी रात्री ९ : २० वाजता व बुधवार दि.७ रोजी पहाटे ६ वाजता भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
चौहूबाजुने डोंगर असलेल्या भोयरे गांगर्डा गावात यापूर्वी डोगरानजीक अनेक वेळा बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले मात्र यावेळी रसाळवाडी नजीक असलेल्या प्रभात डेअरीजवळ बिबट्याने दर्शन दिले असून हा बिबट्या थेट वस्तीत घुसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतात कांदा, मुग, बाजरी, मका, कडवळ, गवत आदी पिके जोमाने वाढली आहे. सारोळा सोमवंशी रस्त्यावर वस्ती परीसरात बाजरी, उंच वाढलेले गवत असल्याने बिबट्यास दडायला जागा मिळाली असून चक्क वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
दरम्यान ग्रामीण भागात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होत असून मध्यंतरी पाडळी रांजणगाव मध्ये घराच्या पडवीत झोपलेल्या कामगारावर बिबट्याने जिवघेणा हल्ला केला. यात तो कामगार गंभीर जखमी झाला होता.
सध्या पावसाने उघडीप दिली असून शेतकरी कांदा, मका, घास, कडवळ, गवत, कांदा रोप आदी पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवस व रात्र विद्युत पुरवठा केला जात असल्याने पिकास पाणी कसे द्यावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.