मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात पावसाने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याच्या साठ्यात अपेक्षित वाढ झाली आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार तडाखा दिला आहे. सध्या पावसाने थोडी उसंत घेतली आहे, परंतु ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. हवामान विभागाने आज, २२ ऑगस्ट रोजी राज्यभर विजांसह पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा सुरू असून आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर बांगलादेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे, ज्यामुळे ही प्रणाली पश्चिम बंगालकडे सरकण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.
पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि अहमदनगर येथे आज हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, रायगड आणि अहमदनगरच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया भागातही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.