ठेवीदारांमध्ये तीव्र संताप
अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे तत्कालिन चेअरमन दिवंगत माजी खा.दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील सदस्य आरोपी आहेत. गांधी कुटुंबातील सर्वच आरोपी अनेक महिन्यांपासून फरार असून नुकतेच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सगळे कुटुंबीय एकत्र आले होते. स्व.दिलीप गांधी यांच्या बंगल्यातच आरोपींनी रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र इतके असूनही पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागलेला नाही. पोलिसांनी खबर मिळताच गांधी यांच्या बंगल्यावरही धाव घेतली. मात्र मधल्या काळात सगळेच फरार झाल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. एका गंभीर आर्थिक घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने ठेवीदार, बँक बचाव कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोणाच्या वरदहस्ताने आरोपींना एवढी मोकळीक दिली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. बँकेच्या जागृत सभासदांमध्ये या प्रकाराची चर्चा रंगली आहे.
113 वर्षांची मोठी परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना तत्कालिन संचालक व काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे संपुष्टात आला. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. यानंतर घोटाळ्याचा तपास होवून आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच ठेवीदारांना त्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी लढा सुरु आहे. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आरोपी निष्पन्न होवूनही पोलिसांना अद्याप सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळता आलेल्या नाहीत. दिवंगत माजी खा.दिलीप गांधी यांच्या परिवारातील मुख्य आरोपी बिनदिक्कत नगरमध्ये स्वत:च्या बंगल्यावर येवून सण साजरे करतात. त्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होतात. एवढे होवूनही पोलिसांना ते सापडत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.
वास्तविक आतापर्यंत पोलिसांनी या घोटाळ्याचा चांगल्या प्रकारे तपास केला आहे. आरोपी निष्पन्न झाले आहेत. काही भ्रष्ट संचालक तसेच कर्ज बुडव्यांना अटकही झालेली आहे. मात्र कुठे तरी मध्येच माशी शिंकते आणि तपास रखडतो. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांना न्यायासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.