बीेड | नगर सह्याद्री
राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर येताना दिसून येत आहे. कारण आता पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, त्यातच त्यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. केज येथील केज घोंगडी बैठकीतून मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी तुम्ही नीट राहा. मराठ्यांनी अजूनही संयम सोडलेला नाही. जर मराठ्यांचा संयम सुटला तर आमदार वगैरे सोडून द्या. तुम्हालाही मराठे महाराष्ट्रात राहू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीसयांना म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा काय करू शकतो हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे. जर आरक्षण दिले नाही तर तुमची सत्ता घालवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलण्याची आमची इच्छा नाही. पण आमचा नाईलाज आहे. तुम्ही सत्तेवर बसला आहात म्हणून आम्हाला नाव घ्यावे लागत असले. नाहीतर तुमचे नाव शंभर पिढ्या तरी मराठे तोंडावर घेणार नाही.मराठा समाज आरक्षणाशिवाय बाजूला हटू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही षडयंत्र न करता मराठ्यांचा आरक्षण देऊन टाका. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवरील चालू असलेले षडयंत्र थांबवले पाहिजे. दररोज ते नवीन नवीन आमदार माझ्या समाजाच्या विरोधात उभे करतात. मराठा समाज इतका वेडा नाही. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत. म्हणजे आपली शक्ती आपल्या विरोधात वापरण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतो का म्हणून बार्शीत एका तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्या डोयातच देत नाहीये की, मी त्यांना उत्तर देत नाही. त्यांना वाटतंय मी घाबरलोय, पण त्यांना माहीत नाही मी कसा आहे. मी जर एखाद्याच्या हातपाय धुवून मागे लागला तर त्याला सोडतच नाही. मला एक बातमी समजली की, एका मराठा समाजाच्या मुलाला अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. त्या लेकराला मारल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणार. त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी आलं असणार. जर तसं झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार आहे. तुमच्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठे गप्प बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांना दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, मी अजूनही सांगत आहे की, नीट राहा. जर मराठ्यांचं डोकं फिरलं तर तुला असा धडा शिकवतील की तुझ्या दहा पिढ्या लक्षात ठेवतील. मराठ्याच्या लेकराला मारहाण झालेली खरी असेल तर एसपी साहेबांना इथूनच सांगतो मराठा बांधवांच्या लेकरांवर कोणी हात उचलला असेल तर ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. नाहीतर सगळ्यांनाच याची किंमत मोजावी लागेल.देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की, तुम्ही त्याला आमच्या अंगावर घातले आहे. जर दोषींना अटक केली नाही तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्ण सरकार घातल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तुम्ही नीट राहा. मराठ्यांनी अजूनही संयम सोडलेला नाही. जर मराठ्यांचा संयम सुटला तर आमदार वगैरे सोडून द्या. तुम्हालाही मराठे महाराष्ट्रात राहू देणार नाही, असा इशाराही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.