spot_img
अहमदनगरविकी, उमदा आहेसच तू! पण, तुला शोधू कुठं रं?

विकी, उमदा आहेसच तू! पण, तुला शोधू कुठं रं?

spot_img

बबनदादांच्या गुलालात सदाअण्णाची खंबीर साथ | मात्र, त्याच सदाअण्णाच्या साजनला वार्‍यावर सोडणार्‍या बबनदादांबद्दल का झालाय नेरेटीव्ह सेट?

आमदारकीचे डोहाळे तरीही कुटुंबातून कोणी लढायचं हा पाचपुतेंसमोर प्रश्न तर विरोधकांकडे तिकीट कुणाकडून मिळवायचं याची मोठी चिंता!

मोरया रे…. / शिवाजी शिर्के
डॉल्बी-डीजेचा आवाज अन् लेसर लाईट्स डोळ्यांवर होणारा दुष्परीणाम या विषयावर थेट जिल्हाधिकार्‍यांनाच साकडं घालणारा बाप्पा आज कोणत्या विषयावर बोलणार या विषयीची उत्सुकता मनात होतीच. कायनेटिक चौकातून थोडे पुढे आलो तर डाव्या बाजूच्या एका छोट्याशा रस्त्याने बाप्पा आत जाताना दिसला. मीही त्याच्या पाठीमागे जायला निघालो. साधारणपणे शंभर मीटर त्याच्या पाठीमागे गेलो तर समोर राष्ट्रवादी भवन असा फलक असणारी मोठी टोलेजंग इमारत दिसली. इमारतीच्या बाहेर नेहमी दिसणार्‍या गाड्या नव्हत्या! बाप्पा इमारतीकडे एकटक पाहत उभा होता. अवतीभोवती कोणी नव्हतं आणि कोणी येण्याची चिन्हे देखील नव्हती. बाजूलाच सुजित झावरे यांचे कार्यालय आणि दुसर्‍या बाजूला झावरे यांचे निवासस्थान! झावरेंच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी अन् राष्ट्रवादी भवन सामसूम!

मी- (धाडस करुन बाप्पा जवळ गेलो.) भल्या सकाळी इकडं कुठे रे? बाप्पा, कसलं निरीक्षण करतोस रे!

श्रीगणेशा- मी कुठं जायचं? कोणाला भेटायचं? काय निरीक्षण करायचं हे तुम्ही पत्रकार मंडळी ठरवणार आहात का?

मी- (बाप्पाचा मूड ठिक नसल्याचं एव्हाना मी ताडलं) बाप्पा, अरे सकाळी सकाळी चिडायला काय झालं! काळजी वाटते रे तुझी! तू असा एकटा- दुकटा फिरतोस म्हणून!

श्रीगणेशा– माझ्या काळजीचं सोड रे! बबनराव भेटले होते काल!

मी- कोण बबनराव रे!

श्रीगणेशा- अरे बापरे! विसरलास की काय? अरे कधीकाळी मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद आणि मग त्या माध्यमातून काय काय केले हे मी सांगण्याची गरज आहे का रे तुला?

मी- ओह्…. पाचपुते साहेब, असं म्हण की रं बाप्पा!

श्रीगणेशा- साहेब असतील तुम्हा पत्रकार मंडळींसाठी! माझ्यासाठी सारे सारखेच!

मी- बरं बाबा, काय म्हणाले दादा?

श्रीगणेशा- ख्याली खुशाली विचारत होते! सारं काही मिळालं असं म्हणताना आता विक्रमकडे लक्ष असू द्या बाप्पा, असं आर्जव करत होते माझ्याकडे! तुम्हा मानव जातीला पुढच्या पिढीची काळजी किती ते बघ!

मी- बाप्पा, पुत्रप्रेम अवघड असते रे!

श्रीगणेशा- याच पुत्रप्रेमातून महाभारत घडलं! तुमचा दादा तरी त्यास अपवाद कसा असेल?

मी- विकीदादा मध्ये मोठी धमक आहे रे! दादांची गादी तोच सक्षमपणे चालवू शकतो बरं का! साखर कारखाना, शिक्षण संस्था अन् तरुणांची मोठी फळी सोबत आहे विकी दादाच्या! निवडणुकीसाठी जे- जे लागतं ते-ते सारं विकीदादा हाताळू शकतो! बबनदादांनी काळजी करण्यासारखं काहीच नाही!

श्रीगणेशा– तुझं हे जे शेवटचं वाक्य आहे ना, तेच मला जरा घातकी वाटतं! खरंतर तुम्हा पत्रकार मंडळींचं काम हेच आहे! अरे बाबा, धमक असणारा तरुण कार्यकर्ता म्हणून विकीची ओळख नक्कीच आहे. ते त्याने दादा पालकमंत्री असताना दाखवूनही दिलंय! दादांच्या कालच्या भेटीत त्यांनी विकीच्या काळजीचा विषय काढला म्हणून तर मी राष्ट्रवादी भवन पाहण्यास आलो! या इमारतीचा पाया खोदण्यापासून या इमारतीमधील प्रत्येक दालन तयार होण्यापर्यंत बबनदादांपेक्षा विकीने लक्ष दिले. इमारतीच्या उभारणी दरम्यान पक्षाध्यक्ष असलेले मोठे पवार साहेब हे बबनदादांपेक्षा याच विकीसोबत बोलायचे! विकी हा तर त्यावेळी मोठ्या पवारांच्या गळ्यातील ताईत झाला होता. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पवार साहेबांचे जंगी स्वागत करण्यात याच विकीदादाने पुढाकार घेतला होता. या इमारतीच्या उभारणीत पक्षाचा दहा टक्के निधी देखील खर्च झाला नसेल. याचाच अर्थ बबनदादांनी आणि विकीने ही इमारत उभी करण्यासाठी खस्ता खाल्या हेही वास्तव नाकारता येणार नाही.

मी- बाप्पा, म्हणून तर मी म्हणतो की विकीदादामध्ये धमक आहे. एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करण्याची धमक त्याच्यात आहे हे त्याने कृतीतून दाखवून दिले! म्हणूनच तर आदरनीय पवार साहेबांच्या गळ्यातील ताईत झाला होता आमचा विकी दादा!

श्रीगणेशा- संधी मिळाली की कौतुक करणारच तू!

मी- बाप्पा, कौतुक करण्यासारखं काम आहे म्हणून तर बोलता ना मी!

श्रीगणेशा- कौतुक…? (असा शब्द बोलून बाप्पानं मोठा प्रश्नार्थक नजरेचा पॉझ घेतला!)

मी- होय, अरे उमदा तरुण आहे. अशा तरुणांच्या कामाचं कौतुक करायचं आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं काम केलंच पाहिजे ना! त्यातूनच त्यांना सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळेल ना!

श्रीगणेशा- ऊर्जा….! म्हणजे त्या कुतवळांची तर नाही ना!

मी- कुतवळांची ऊर्जा? म्हणजे नक्की काय म्हणायचं रे बाप्पा तुला?

श्रीगणेशा- जाऊ दे! तुुलाच काय तमाम श्रीगोंदेकरांना कुतवळांची ऊर्जा हा विषय माहितीय! कशाला मला या विषयावर बोलते करतोस? जास्तच कौतुक करतोस तू विकीचं! तुझा मित्र दिसतोय विकी!

मी- अरे बाप्पा काम चांगलं करतोय म्हणून बोलतोय! त्याच्या चुका असतीलही! तरुण आहे! थोडाफार चुकणारच! त्याला आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार रे!

श्रीगणेशा- व्वा…. मैत्री इतकीपण आंधळी नसावी बरं! २०१४ मधील पराभवानंतर गायब झालेला तुझा हा विकी चारीधामला गेला होता का? २०१९ मध्ये श्रीगोंदेकरांनी कौल दिला! यानंतरही पहिल्या तीन वर्षात हाच तुझा विकीदादा पुण्यात कुठं-कुठं आणि काय- काय करत होता हे मी जाहीरपणे सांगण्याची गरज आहे का रे? गेल्या दीड-दोन वर्षात आणि त्यातही अलिकडच्या सहा-सात महिन्यात अवतीर्ण झालेला तुझा हा उमदा विकीदादा कायकाय करत आहे हेही मीच सांगू का? खासगी साखर कारखान्याच्या मुद्यावर आमदारकी बबनदादांना आमदारकी गमवावी लागली होती. काष्टीची हवेली आणि त्या हवेलीची तटबंदीही नडली होतीच ना! हिरडगाव अन् देवदैठण हे दोन्ही साखर कारखाने खासगी प्रॉपर्टी! या दोन्ही कारखान्यांनी ऊस उत्पादकांची देणी थकवली! आजही त्यातील काही देणी बाकी आहेच ना! हिरडगावचं युनीट चालू असलं तरी गौरीशुगरला ते चालवायला देण्यात आल्याचं सांगितलं जातं. देवदैठण युनीट तर बंदच आहे. पुतण्या असणार्‍या साजनला हे युनीट देण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. दादांच्या राजकारणात सावलीसारखी साथ देणार्‍या सदाअण्णाचं किती आणि कसं योगदान राहिलं हे सर्वश्रूत आहे. त्याच सदाअण्णाच्या खंबीर साथीने दादांनी अनेकदा गुलाल घेतला! मात्र, आज त्याच सदाअण्णाचा साजन बबनदादांना का नकोसा वाटू लागलाय? सदाअण्णांना राजकीय महत्वाकांक्षा नसेलही! मात्र, याचा अर्थ साजन यानेही ती महत्वाकांक्षा ठेवू नये असे कसे होईल रे! विकीने ही महत्वाकांक्षा ठेवायची आणि साजन याने सदाअण्णासारखी तुमची तळी उचलायची अशी अपेक्षा तरी का ठेवायची! पंढरीच्या वारीत हे असलं पेरलं जातं का रे, याचंही उत्तर बबनदादांना द्यावं लागणार आहे बरं!

मी- बाप्पा, सदाअण्णाबद्दल आणि त्यांच्या खंबीर साथीबद्दल दादा आजही कौतुकच करतात आणि सदाअण्णाच्या त्या आठवणींनी गहिवरुन जातात. बबनदादा सध्या आजारी आहेत! बबनदादा आमदार असले तरी कारभार विकीच पाहतोय! उद्या वहीनी आमदार झाल्या तरी विकीच कारभार पाहणार! कारभार जर विकीच पाहणार असेल तर विकीच उमेदवार पाहिजे अशी जनभावना आहे रे!

श्रीगणेशा- बबनदादांचं आजारपण सर्वश्रूत आहे. त्यातून ते बाहेर पडावेतच! असं आजारपण कोणाच्याही वाट्याला नसावं रे! अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे सारं वैभव उभं केलं. सदाअण्णांची खंबीर साथ त्यात नक्कीच राहिली असल्याचं बबनदादा मान्य करत असले तरी तुझा विकीदादा हे मान्य करतोय का रे? येणार्‍या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी दादांच्या कुटुंबात असणार असल्याची चर्चा आहे. निर्णय काय व्हायचा तो होईल. मात्र, दादांच्या आजारपणात तुझा विकीदादाच मिनीआमदार झालाय! दादा आजारी असताना जर मी सर्व काही काम करतोय तर उद्या मीच आमदार म्हणून निवडून येऊ शकतो ही तुझ्या विकीदादाची भावना झालीय. याशिवाय कुटुंबातून दुसर्‍या दावेदार समजल्या जातात त्या बबनदादांच्या अर्धांगीणी अर्थातच प्रतिभावहिनी! त्या आमदार झाल्या तरी तुझ्या विकीदादालाच काम पहावे लागणार असल्याची भावना त्याच्यासह त्याच्या सोबतच्या चौकडीने त्याच्यात भरवून दिलीय! २०१४ नंतर गायब झालेला तुझा हा विकीदादा आता अलिकडे म्हणजेच वर्षभरापासून सक्रिय झाल्याचं दिसतंय! उद्या विकीची उमेदवारी पक्षाने अंतिम केली अन् उलटा निकाल लागला तर हा तुझा विकी दादा पहिल्या गाडीनं पुण्यात जाऊन बसेल! प्रतिभावहीनींच्या बाबतीतही तेच घडणार असल्याची जनतेत भावना निर्माण झालीय! श्रीगोंद्यातील जनतेला आता हे नकोय! खंबीरसाथ देणार्‍या सदाअण्णाच्या साजनला वार्‍यावर सोडणार्‍या बबनदादांबद्दल नरेटीव्ह सेट झालाय! तो बदलवण्यात बबनदादांपेक्षा तुझा कथीत उमदा म्हणत असलेला विकीदादा किती यशस्वी होतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. खरंतर श्रीगोंद्याची यावेळची राजकीय परिस्थितीच वेगळे झाली आहे. राहुुुल जगताप यांची उमेदवारी नक्की मानली जात असली तरी कारखाना की आमदारकी याचा पर्याय त्यांना निवडावा लागणार आहे. आता नाही तर कधीच नाही, यानुसार कंबरेला पदर खोचून मैदानात उतरलेल्या अनुराधाताई नागवडे यांना अजितदादांनी शब्द दिलाय! सोबतीला बाळासाहेब नहाटा, दत्ता पानसरे यांच्यासारखे मोहरे आहेत. कारखान्याची यंत्रणा आहे. मात्र, महायुतीत जागा भाजपाकडे आहे ही त्यांची खरी अडचण आहे. मात्र, नागवडेंच्या घरात आमदारकी असणार हे त्या ठासून सांगत आहेत. काँग्रेसवासी झालेल्या घनश्याम शेलारांना बाळासाहेब थोरातांनी शब्द दिलाय आणि दुसरीकडे अण्णासाहेब शेलारही तयारीत आहेतच! साजनचं तिकीट शिवसेनेकडून नक्की असल्याचं संजय राऊत सांगत आहेत! नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट आणि तेथील जनतेची भावना वेगळीच आहे. एकूणच श्रीगोंद्यात ज्यांना तिकीट आहे असं मानलं जातं त्यांच्या घरातून कोणी लढायचं हा प्रश्न आहे तर ज्यांना तिकीट नाही त्यांच्या समोर तिकीट कुणाकडून मिळवायचं हा प्रश्न आहे. या विषयावरही बोलेल मी उद्या!

श्रीगणेशा- (बाप्पाने, राष्ट्रवादी भवन इमारतीकडे कटाक्ष टाकला) तूर्तास तरी माझी निघण्याची वेळ झालीय! उद्या सविस्तर बोलेन! असं म्हणताच बाप्पा पाठमोरा झाला आणि दौंडरस्त्याने चालता झाला!

(नगर शहराच्या वैभवात भर घालणारं राजकीय पक्षाचं प्रशस्त कार्यालय उभारत असताना बबनदादा आणि मित्रवर्य विकीदादा या दोघांनी खालेल्या खस्तांचा मी पत्रकार म्हणून साक्षीदार होतो. बाप्पानं आज त्या वास्तूस भेट दिल्याचं समाधान नक्कीच मला मिळालं. आजच्या भेटीत बाप्पानं बर्‍यापैकी भूमिका मांडली असली तरी कुतवळांची ऊर्जा म्हणजे नक्की काय हे मला समजलंच नाही! उद्याच्या भेटीत बाप्पाला या विषयावर बोलतं करायचंच असं ठरवून मी देखील माझ्या कार्यालयाकडे रवाना झालो.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...