जालना | नगर सह्याद्री:-
राज्यामध्ये मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. एकीकडे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली येथे उपोषणाला बसले असतानाच या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ओबीसींची भाषा कधी येत नाही, ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही वास्तव प्रश्न विचारले होते. मुख्यमंत्र्यांना धनगरांच्या एसटी आरक्षणाबद्दल जीआर काढण्याचा अधिकार नाही, हा अधिकार संसदेचा आहे. मुख्यमंत्री घटनेशी द्रोह करत आहेत. मुख्यमंत्री तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षण धक्का लागत नाही जरांगे म्हणतात आम्ही आरक्षण घेतलंय, नक्की कोण खरं बोलत आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंसह जे आमच्या आरक्षणाबद्दल बोलले नाहीत, त्यांना आम्ही बॉयकॉट करणार आहोत. ओबीसी फक्त ओबीसींना मतदान करणार आहेत. जरांगे यांना रात्री पवार फॅमिली येऊन भेटते. ज्या देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाने सारथीला निधी निर्माण करून दिला ते सगळी माणस आज देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शिव्या घालतात. ओबीसींच्या बाजूने भूमिका न घेणार्यांच्या सोबत कधीही सामील होणार नाही, आम्ही या निवडणुकीत पाडणार आहे सुरवात घनसांवगी पासून करणार आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.