Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा करणार हे चालणार नाही. श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच असून येथे आपलाच उमेदवार असणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे मांडली. श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप हेच उमेदवार असल्याचे संकेतही त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. श्रीगोंद्याची जागा शिवसेना लढणार असल्याची भूमिका खा. संजय राऊत यांनी मध्यंतरी मांडली होती. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राऊत यांचा नामोल्लेख टाळत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत नगर जिल्ह्यातील जागा वाटपाचं गुर्हाळ अद्याप चालूच आहे. मात्र, मध्यंतरी श्रीगोंद्याची जागा शिवसेनाच लढणार आणि साजन पाचपुते येथील उमेदवार असणार असल्याची घोषणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या घोषणेची खिल्ली आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडवली.
श्रीगोंद्यातील शिष्टमंडळाने आज पवार यांची बारामती येथे भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळात माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हरिदास शिर्के आदींसह तीनशे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना नेते संजय राऊत यांचा नामोल्लेख टाळत शरद पवार यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टिका केली! कोणीतरी मुंबईतून येणार अन् उमेदवारी जाहीर करणार हे चालणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच त्यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक केले. कारखाना अडचणीत असतानाही राहुल जगताप यांनी आपल्याला भक्कम साथ दिल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.