मुंबई । नगर सहयाद्री:-
देशातील हवामानात सध्या अनेक मोठे बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात सध्या पाऊस पडतोय. त्यातच येत्या दोन दिवसांत वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पाऊस पुनरागमन करेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.