Ahmednagar Crime News: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. संतराम उर्फ संजय उमाजी मतकर (अंदाजे वय ४५) रा. पाचेगाव असे विहिरीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
संजय मतकर पाचेगाव-गुजरवाडी या रस्त्यावर शेतात घर करून राहत होता. घराच्या काही फुटाच्या अंतराव सकाळच्या दरम्यान घटना घडली. या घटनेची माहिती पाचेगाव, पुनतगाव येथील पोलीस पाटील जय वाकचौरे यांनी पाचेगाव येथील बीट हवालदार यांना फोनद्वारे कळविली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दोन चिठ्ठ्या वेगवेगळ्या अवस्थेत मिळून आल्या. या चिठ्यांत नेमके काय लिहिले आहे ते मात्र समजू शकलेले नाही. पोलिसांनी या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. दरम्यान नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.