अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगरच्या जागेवरून महायुतीच्या गोट्यात सध्या तिढा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला जाणार आहे. मात्र, महायुतीत आता या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. काही काही ठिकाणी तर मित्र पक्षांमध्येच जागा वाटपावरून वाद होतील की काय असे देखील शक्यता आपल्याला दिसून येत आहे. अशातच नगर विधानसभेची जागा भाजपला घेण्याची जोरदार मागणी भाजपच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
नगर शहर विधानसभेची जागा भाजपला घेण्याची जोरदार मागणी शनिवारी येथे झालेल्या शहरातील जुन्या-नव्या पदाधिकार्यांनी केली. तसा ठरावही करण्यात आला व येत्या २५ रोजी प्रदेश भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत हा ठराव पक्षश्रेष्ठींना देण्याचेही ठरवण्यात आले. दरम्यान, पक्षांतर्गत वादविवाद आता दूर ठेवू व आधी नगर शहराची जागा पक्षाला मिळवू, असाही निर्धार या बैठकीत करण्यात आला.महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा पवाराच्या राष्ट्रवादीला नगर शहराची जागा देण्याचे घाटत आहे. सध्याचे विद्यमान आमदारही याच आहेत व व या राष्ट्रवादीच्या पहिल्या जाहीर झालेल्या २० जणांच्या नावात नगर शहराच्या आमदारांचेही नाव असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते व पंडीत दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी काही दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून नगर शहराची जागा भाजपला घेण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने नगर शहरातील भाजपचे जुने व नवे पदाधिकारी शनिवारी (२१ सप्टेंबर) एकत्र आले. येथील बडीसाजन मंगल कार्यालयात ही बैठक झाली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, वसंत लोढा. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, नरेश चव्हाण, दामूशेठ बठेजा, बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र काळे, अनिल मोहिते, सचिन पारखी, सुनील रामदासी, अच्युतराव पिंगळे, भय्या गंधे, प्रा. मधुसूदन मुळे, गोकुळ काळे, नरेंद्र कुलकर्णी आदींसह अन्य उपस्थित होते.
मेळाव्यात बहुतांश वक्त्यांनी भाजपअंतर्गत मतभेदांचा उल्लेख करून मित्रपक्षांवरही शरसंधान साधले. आपल्यात मतभेद तर आहेत. पण मित्रपक्षाकडूनही आपली अवहेलना होते, अशी खदखद सानप यांनी व्यक्त केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला ५९ हजाराचे मताधिकृय नगर शहरात असताना आताच्या निवडणुकीत ते ३२ हजार कसे राहिले, असा सवालही त्यांनी केले. चव्हाण म्हणाले, कोणीही उमेदवार द्या, पण पक्षाशी एकनिष्ठ असलेला द्या. अॅड. पिंगळे म्हणाले, आपण एकमेकांवर कुरघोड्या करीत अलतो व दुसरीकडे आपली सत्ता असताना आपलीच कामे होत नाहीत, असा दावा करताना नगरमधील एका बँकेसंदर्भातील तक्रारीबाबत पक्षाच्या मंत्र्यांकडून आलेल्या अनुभवाचा किस्सा त्यांनी सांगितले.
या बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांनी सर्व पाचही इच्छुकांनी एकत्र बसून एकच चेहरा ठरवण्याचे आवाहन केले. याला नरेंद्र कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. इच्छुक कोणी ठखले, आम्हाला ला चारच चारच नावे माहीत आहेत. पाचवा कोण आहे? मीही इच्छुक आहे, असे भाष्य त्यांनी केल्यावर त्यावर जुगलबंदी रंगू लागली. मात्र, वातावरण तापत असल्याचे पाहून शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी हस्तक्षेप केला. नगर शहराची शह जागा भाजपला मिळावी, या मागणीसाठी ही बैठक बोलावली आहे. तिकिटाचा विषय प्रदेश भाजपचा आहे. असे स्पष्ट करून त्यांनी वादावादी थांबवली.