पारनेरकरांनो हीच वेळ, ५० वर्षांपासून सुरू असलेल्या “या” लढ्याला साथ देऊया…
पारनेर/प्रतिनिधी :
समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याची ओळख महाराष्ट्र नव्हे तर देश विदेशात पोहचली आहे. तसेच याच तालुक्यात राजकीय नेत्यांचा बोलबाला देखील तेवढाच आहे. त्यामुळे पारनेर मधे कधी काय घडेल हे सांगण तितक सोपं नाही. मात्र याच तालुक्यात एका गोष्टींसाठी गेल्या ५० वर्षांपासून संघर्ष होत आहे. मात्र तो संघर्ष आजही संपलेला नाहीये. कारण राजकीय पुढाऱ्यांच राजकारणच त्यावर अवलंबून आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून पारनेर तालुका ओळखला जातो. दुष्काळग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी ५० वर्षांपासून पाणी प्रश्नावर विविध आंदोलने झाली. मात्र अद्यापपर्यंत कुठेही तोडगा निघाला नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील नागरिक घोटभर पाण्यापासून वंचित राहिले आहे.
आता मात्र न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पाणी प्रश्नावर जातीने लक्ष घालून पाणी प्रश्नच सोडविण्याचा निर्धार केलाय. तसेच हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी थेट आमरण उपोषणच सुरू केलंय. गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून मोठा पाठिंबा देखील मिळताना दिसत आहे. या भुमिपत्रांनी पाणी प्रश्नासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबल्याने गावागावातून, विविध संघटना, राजकीय पक्ष, संस्था, ग्रामपंचायत, सामाजिक संस्थांसह आदिंनी जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे पाणी प्रश्नासाठी पारनेरकर एकजूट होताना दिसत आहे. त्यातच विशेषतः राजकीय नेत्यांनी विशेष लक्ष देऊन हा पाणी प्रश्न आपआपल्या परिने वरीष्ठ पातळीवर नेऊन आवाज उठवला तर पाणी प्रश्न सुटण्यास अधिक वेळ देखील लागणार नाही. मात्र ते राजकीय पुढाऱ्यांनी मनावर घेतले तरच.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी गेल्या पाच दिवसांपासून आपले वैयक्तिक काम, घर – दार सोडून तसेच कुठलंही राजकारण न करता एका जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी उपोषणाला सुरुवात केलीय. मात्र जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याची ठाम भूमिका देखील उपोषणकर्त्यांनी घेतलीय. त्यामुळे पारनेरकरांनो आता हीच वेळ आहे. या लढ्यात उतरून आपल्या हक्काच पाणी मिळविण्यासाठी उपोषणकर्त्यांना साथ देण्याची.
उपोषणकर्त्यांनी पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून पारनेरसह नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगण सिद्धी, शहांजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करावे तसेच डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे, अटी- शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावे, रेगुलर कर्जदारांना प्रोत्साहन पर देण्यात येणारे पन्नास हजार रुपये ठराविक शेतकऱ्यांना मिळाले मात्र उर्वरित वंचित शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे अशा विविध मागण्या केल्या आहेत.
तसेच कुकडी या संयुक्त प्रकल्पाची निर्मिती पुणे, नगर, व सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आली. प्रकल्प पूर्ण होऊन पुणे जिल्हा वगळता पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील काही अंशी भाग ओलिता खाली आला उर्वरित 90% शेती आजही दुष्काळाच्या छायेखाली आहे पारनेर नगर तालुका हा अत्यंत दुष्काळी प्रदेशातील असून येथील पर्जन्यमान अत्यंत कमी आहे दुष्काळग्रस्त गावांना दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो व यावर शासनाचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. या पठारभागावरील सुपीक जमीन केवळ सिंचना अभावी कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना बेरोजगारांना उपजीविकेसाठी स्थलांतर करावे लागत आहे. कुकडी प्रकल्पाच्या 1966 सालच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये या दुष्काळी भागासाठी एक टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली होती पण अद्याप पर्यंत या पाण्या वाचून पारनेर,नगर,श्रीगोंद्यातील बराचसा भाग वंचित राहिला आहे. कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजपुर, या उपसा सिंचन योजनेंचा शासन दप्तरी नोंद असल्या कारणाने वरील उपसा सिंचन योजनेंना मान्यता देऊन कार्यान्वीत करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.
सध्याचे वाढलेले सिंचन, वाढलेली कारखानदारी, आणि उपलब्ध होणारे पाणी यात खूपच तफावत आहे त्यामुळे पाण्यासाठी होणारा संघर्ष पाहता त्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. पश्चिमेकडील घाट माथ्यावर पर्जन्याचे प्रमाण भरपूर आहे पण साठवण क्षमता कमी असल्याने जवळपास ६०० ते ८०० टीएमसी पाणी कोकणात वाहून जाते. अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून दुष्काळी भागाला दिल्यास अख्खा महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकतो.
शासनाच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणांमुळे पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, खते, औषधे, बि बियाणे यांचे वाढलेले दर आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न याची बेरीज वजाबाकी केल्यास हातात काही शिल्लक राहत नाही परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो याचा विचार करत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उद्धवजी ठाकरे यांच्या काळात दोन वेळा कर्जमाफी झाली पण त्यांनी लावलेल्या अटी शर्तीमुळे निम्म्याहून अधिक शेतकरी वंचित राहिले तसेच रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहांन पर ५०००० देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापासूनही बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून अटी शर्ती न लावता सरसकट कर्जमुक्त करण्यात यावे. या सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच असून शासनाने तातडीने मान्य कराव्या अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केलीय