अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रूग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्याची तोफखाना पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान पोलिसांनी चौकशी करुन सोडून दिल्यानंतर त्या कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे. योगेश बबन बनकर (रा. भिंगार) असे त्या कर्मचार्याचे नाव आहे.
जिल्हा रूग्णालयातील अज्ञात कर्मचार्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रूग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरली. त्याव्दारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे.
या प्रकरणी जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी तालुयातील सागर भानुदास केकान, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, गणेश रघुनाथ पाखरे यांच्यासह जिल्हा रूग्णालयातील अज्ञात कर्मचार्यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत. पोलिसांनी तपासादरम्यान दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी काम करणार्या जिल्हा रूग्णालयातील संबंधीत कर्मचार्यांचे जबाब नोंदविले आहेत.
दरम्यान, दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यात जिल्हा रूग्णालयातील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास केला असता काही नावे निष्पन्न करण्यात आली. त्यातील योगेश बनकर या कर्मचार्याचे नाव समोर आले. मंगळवारी योगेशची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याला नातेवाईकांकडे देण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.