पुणे / नगर सह्याद्री –
‘बिग बॉस शो’मध्ये प्रथम पारितोषिक जिंकलेल्या सूरज चव्हाणची सर्वत्र चर्चा होत आहे. बारामतीतील मोढवे गावातील सूरज चव्हाणवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. ‘बिगबॉस शो’मध्ये सूरजने प्रथम पारितोषिक जिंकल्यानंतर त्यांचं सर्वांकडून तोंडभरून कौतुक होत आहे. बिग बॉसमध्ये बाजी मारल्यानंतर सूरजच्या सोशल मीडियावर चाहत्यात भर पडली आहे. गरीब कुटुंबातील सूरज चव्हाणने कार्यक्रमात गावात घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच सूरजचं आता स्वप्न पूर्ण होणार आहे. आज शनिवारी सूरजने अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी घर बांधून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणचा सत्कार केला. अजित पवारांनी सूरजशी बराच वेळ चर्चा देखील केली. यावेळी अजित पवारांनी त्याच्या घरच्यांची विचारपूस केली. पुण्यात झालेल्या भेटीत अजित पवारांनी सूरज चव्हाणला मोढवे गावात चांगलं घर बांधून देणार असल्याचं आश्वासन दिलं. अजित पवारांनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिल्याने सूरजचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
अजित पवार काय म्हणाले?
सूरज चव्हाणची भेट झाल्यानंतर अजित पवार म्हणाले, ‘सूरजची ही सुरुवात आहे. काल सयाजी शिंदे यांना पक्षप्रवेश दिला. ते एक परिपक्व व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी दाक्षिणात्य सिनेमातही काम केलं आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सह्याद्री, देवराई वृक्षरोपण केलं आहे. ते काही उमेदवारांचा प्रचार करतील’.
‘सूरजचं स्वत:चं गाव आहे, तिथे त्याला घर बांधून देणार आहे. पुढे पुण्यात म्हाडाच्या योजनेतून घरासाठी प्रयत्न करेल. त्याची एक बहीण, दाजी त्याचाबरोबर राहतात. त्याचं बालपण मोढवे गावात गेलं आहे. त्याचं पहिलं घर तिथे असणं गरजेचं आहे. त्याची वाटचाल कशी होईल, ते पाहून पुण्यात त्याच्या घरासाठी विचार करू. आम्ही त्याला एकटा सोडणार नाही. आम्ही त्याला मदत करू, असे ते म्हणाले.
अन् सूरज चव्हाण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकला
‘बिग बॉस मराठी शो’चा पाचवा सीझन नुकताच संपला. ७० दिवस चाललेल्या कार्यक्रमात रील स्टार आणि टीव्ही कलाकार, गायक देखील होते. या कार्यक्रमात सूरज चव्हाणने घर बांधून त्याला ‘बिग बॉस’चं नाव देणार असल्याचं जाहीर केलं होतं. कार्यक्रमातील इतर स्पर्धकांनीही त्याला घरासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. गरीब कुटुंबातील सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना गावात घर बांधणार असल्याचे सांगितले होते. याच सूरज चव्हाणचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.