मुंबई। नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही तारीख झालेली नाही. महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार? आचार संहिता कधी लागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतांनाच मोठी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मविआमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून वाद सुरू आहे.
तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये देखील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं 11 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतलीय. विधानसभा निवडणुकांचा वेध सर्वच पक्षांना लागला आहे.
आता आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलंय. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकारपरिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मंत्रालयात आज शेवटची कॅबिनेट बैठक
मंत्रालयातील हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. आज पुन्हा सकाळीच साडेनऊ वाजता बोलावली मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे.
२४ तासात राज्यात आचारसंहिता लागणार?
महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी २८८ मतदारसंघात निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्र झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी केली जाऊ शकते. त्यामुळे २४ तासांनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर तर झारखंडमध्ये ८१ जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.