जामखेड, नगरसह जिल्ह्यातील शिक्षिकांनी वाटले पेढे | सीइओ येरेकर यांचा अहवाल ठरला निर्णायक
पाठलाग बातमीचा । शिवाजी शिर्के
सहशिक्षिका असणाऱ्या महिला शिक्षिकेबद्दल असभ्य वर्तन करणारा जामखेडचा तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे याच्यावर राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी अखेर निलंबनाची कारवाई केली. धनवे याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना बाळासाहेब धनरवे या अधिकार्याने या महिला शिक्षिकेवर डोळा ठेवत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत दि. 25 आणि 26 ऑगस्ट 2024 रोजीच्या अंकात धनवे याचे सविस्तर कारनामे नगर सह्याद्रीने प्रकाशित केले होते. अखेर त्याची दखल घेण्यात आली आणि धनवे याला निलंबीत करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी काढले.
बाळासाहेब धनवे याच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. या सात सदस्यांच्या चौकशी समितीने या वासनांध धनवे याच्या विरोधात अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल जामखेड गट विकास अधिकार्यांनी लागलीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सादर केला. त्यानुसार वासनांध धनवे याच्या विरोधातील अहवाल आशिष येरेकर यांच्या कार्यालयाने दि. 31 जुलै 2024 रोजी तयार केला आणि दोषारोप पत्रातील मुद्दा क्र 1 ते 4 असा अहवाल तयार झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यावर दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी सही केली.
येरेकर यांच्या सहीने सदरचा अहवाल शिक्षण आयुक्तांच्या पुणे कार्यालयास सादर केला गेला. आयुक्तांच्या कार्यालयास अहवाल सादर झाल्यानंतर शिक्षण आयुक्त म्हणून काम पाहणारे सुरज मांढरे यांनी त्यावर लागलीच कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. एका महिला कर्मचार्याच्या बाबत गंभीर प्रकार घडला असताना आणि त्यात शाळेतील मुलांसह चौकशी समिती, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सार्यांनीच धनवे याच्यावर कारवाई करण्याचा अहवाल सादर केला होता.
सादर करण्यात आलेल्या अहवालावर दि. 15 ऑक्टोबरच्या पत्रानुसार राज्यपालांच्या मान्यतेने आदेश काढण्यात आले असून धनवे याला शासकीय सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, धनवे याचे निलंबन कालावधीत मुख्यालय हे जिल्हा परिषद मुख्यालय असणार आहे. धनवे याच्या निलंबनाचे आदेश निघताच या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व महिला शिक्षिकांसह महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. जामखेडमध्ये या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले.
निलंबित कालावधीत देण्यात आलेले मुख्यालय बदलण्याची मागणी!
जामखेडमध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याआधी नगर तालुक्यात आणि जिल्ह्यात काम करणार्या बाळासाहेब धनवे याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या. त्यातही महिलांच्या तक्रारी सर्वाधिक होत्या! आचारसंहिता भंगाची तक्रार देखील झाली. महिला शिक्षिकेला वासनांध मानसिकतेतून पाहणाऱ्या विकृत धनवे याच्या विरोधात बीडीओ, सीईओ अशा सार्यांनीच अहवाल सादर केला. दरम्यान, विकृत मनोवृत्तीतून वागणाऱ्या धनवे याला नगरमध्येच उपशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती दिली! धनवे याच्यावर तातडीने कारवाई होण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नाही. आता त्याला निलंबीत करण्यात आले असले तरी त्याचे मुख्यालय जिल्हा परिषद मुख्यालय देण्यात आले असून त्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवागनीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण झाली असताना शासकीय सेवेतील महिलांचा अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीतून छळ करणाऱ्या धनवे याचे निलंबन झाल्याने त्या कारवाईचे स्वागत होत असले तरी त्याचे मुख्यालय नगरऐवजी अन्यत्र करावे अशी मागणी आता महिला कर्मचाऱ्यांमधून पुढे आली आहे.
कठोर भूमिका घेणाऱ्या आशिष येरेकर यांचे अभिनंदन!
बाळासाहेब धनवे याच्या कृष्णकृत्यांची माहिती मिळाल्यानंतर आणि महिलांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेण्याचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिग छळ प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण अधिनियम 2013 नुसार लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये बाळासाहेब धनवे यांचे वर्तन येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली. येरेकर यांच्या अहवालाची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. खरे तर या प्रकरणात येरेकर यांच्या कार्यालयाकडून प्रस्ताव उशिरा गेल्याची चुकीची माहिती समोर आली होती. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नव्हते आणि नाही. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच आशिष येरेकर यांनी हा अहवाल प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी शिक्षण आयुक्तांकडे सादर केला. आता त्यावर कारवाई झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्याही दबावाला बळी न पडता कणखर भूमिका घेणाऱ्या आशिष येरेकर यांचे जिल्ह्यातील शिक्षकांसह महिला कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.