Politics News: महाराष्ट्रात विधानसभेचा बिगुल वाजला आहे. सर्वच राजकीय नेते मंडळींनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उमेदवारीवरून आगामी काळात महायुती व महाविकास आघाडीत बरीच उलथापालथ होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. येथे महायुतीमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनाच उमेदवारी असल्याची चर्चा आहे. मात्र पारंपरिक विरोधक असलेले कोल्हे कुटुंबीय महायुतीची साथ देणार का? पुन्हा राजकीय मैदानात उतरणार याबाबत जोरदार चर्चा मतदार संघात आहे.
दरम्यान आता यात नवीन ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजपच्या माजी प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना बुधवारी चर्चेसाठी मुंबईत आमंत्रित केले होते. त्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून जायचं की थांबायचं याचा अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कोल्हे कुटुंब भाजपसाठी महत्त्वाचे असल्याने स्नेहलता कोल्हे यांना थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
स्नेहलता व बिपीन कोल्हे यांचे चिरंजीव विवेक हे या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली होती. काही झाली तरी मैदानात उतरायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून मतदारांच्या नजरा याकडे लागल्या आहे.