अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरासह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपनगरातील तवले नगर पोलिस कॉलनी येथे पाच वर्षीय शिवार्थ शेखर डहाके या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून मुलाचे नातेवाईक व माजी नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.
गेली सहा महिन्यांपासून नगर शहरात मोकाट कुत्री पकडणे बंद आहे. त्यामुळे शहरासह उपनगरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वीही मोकाट कुत्र्यांमुळ अनेक जण जखमी झाले आहेत. तशा तक्रारीही आयुुक्तांकडे दाखल आहेत. पुन्हा मोकाट कुत्र्यांनी चिमुरड्यावर हल्ला केल्याने कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरासह उपनगरात अनेक भागात मोकाट कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर हिंडत आहेत.
त्यामुळे रस्त्यावरुन ये जा करतांना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहेत. जखमी मुलाच्या नातेवाईकांनी तसेच माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, सेवानिवृत्त पोलिस रजपूत, दरंदले, अॅड. खेडकर, शेखर डहाके, सुरेश डहाके यांनी आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले.