अहमदनगर | नगर सह्याद्री
महावितरणे संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास करण्यात आलेल्या सक्तीला आम आदमी पार्टीच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. सदरचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आपच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना देण्यात आले.
यावेळी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ, शेतकरी आघाडी अध्यक्ष काकासाहेब खेसे, महिला आघाडी अध्यक्ष विद्या शिंदे, जिल्हा महासचिव इंजि. प्रकाश फराटे, उपाध्यक्ष अंबादास जाधव, प्रतीक म्हस्के, अनुसूचित जाती-जमाती आघाडी अध्यक्ष तुकाराम भिंगारदिवे, महासचिव दिलीप घुले, समाजसेवक मच्छिंद्र आर्ले आदी उपस्थित होते.
स्मार्ट विद्युत मीटरची करण्यात आलेली सक्ती राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक शोषण करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा आरोप आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केला आहे. स्मार्ट विद्युत मीटरची निर्मिती व जोडण्याची किंमत सहा हजार रुपये प्रति मीटर अपेक्षित आहे. मात्र या मीटरचा किमतीत दुप्पट वाढ करून १२ हजार रुपये प्रति मीटर दराने नागरिकांकडून वसुल करण्यासाठीचा कंत्राट खाजगी कंपन्यांना देण्यात आला आहे.
भांडवलवादी कंपन्यांना फायदा व्हावा, या हेतूने शासनाने ही योजना आखली आहे. ग्राहकांना प्रीपेड स्वरूपात विद्युत बिलाचे पैसे भरून ठेवण्यास भाग पाडून, महाराष्ट्राच्या जनतेचा आर्थिक शोषण करू पाहणार्या बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेला आम आदमी पार्टी विरोध करीत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.