नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
आयकर विभागाने बुधवारी दोन राज्यांत टाकलेल्या छाप्यात इतकी रक्कम हाती लागली आहे की मोजणारी मशिनही बंद पडली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा असून आयकर विभागाच्या या कारवाईमध्ये आणखी काय माहिती समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूल येथील मद्य निर्मिती कंपनीच्या आवारात आयकर विभागाने बुधवारी छापे टाकले. यावेळी आयटी पथकाने मोठी रोकड जप्त केली आहे. ही रक्कम एवढी होती की दोन दिवसांत २०० आणि ५०० रुपये मोजणार्या मशीननेही काम करणे बंद केले.
या कारवाईत जप्त केलेल्या रक्कमेमध्ये आतापर्यंत ५० कोटी रुपये मोजले गेले आहेत. या नोटा दोन ट्रकमध्ये भरून मोजणीसाठी बँकेत पाठवल्या होत्या. बुधवारी आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर छापे टाकले. तपास पथकाने ओडिशातील संबलपूर आणि बोलंगीर येथे ही कारवाई केली. झारखंडच्या रांची आणि लोहरदगा येथील कंपनीच्या परिसराचीही पथकाने झडती घेतली.
आयकर विभागाने १५० कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती आहे. ज्या कंपनीच्या कार्यालयात इतकी मोठी रक्कम सापडली ती कंपनी पश्चिम ओडिशातील सर्वात मोठी दारू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे बौद्ध डिस्टिलरीजशी व्यावसायिक संबंध आहेत. तितलगडमधील दारू माफियांच्या घरांवरही आयटी कंपनीने छापे टाकले. मात्र, सर्व आरोपी फरार झाले. या शिवाय आणखी एका मद्यनिर्मिती कंपनीच्या कार्यालयावर आयटी पथकाने छापा टाकून ११० कोटी रुपये जप्त केले.