छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री
मराठा आरक्षण प्रश्नावरून अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तान्हाजी सावंत यांच्यावर तोफ डागली आहे. बेधडक अन् स्फोटक वक्तव्यांसाठी मंत्री तान्हाजी सावंत प्रसिद्ध आहेत.
मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या मुद्यावर सावंत यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सुतळी बॉम्ब फोडले. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सावंत यांना शिंगावर घेत त्यांच्याविरुद्ध उखळी बॉम्ब फोडले. जरांगे-पाटील विरुद्ध सांवत असा खडाखडीचा सामना रंगला. त्यातून सावंत मराठ्यांच्या हिटलिस्टवर येण्याची शयता आहे. दोघांमधील संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सावंत आणि जरांगे-पाटील यांच्यामधील जशास तसा संवाद…
सावंत : मराठा आरक्षण कधी मिळेल, हे सांगायला जर-तरच्या गोष्टी करायला मी काय ज्योतिषी नाही. मी काय पंचांग घेऊन बसलेलो नाही.
जरांगे-पाटील : आरक्षण कधी द्यायचं, कसं द्यायचं ते सरकारला कळतं. तुम्ही काय ज्ञान पाजळायची गरज नाही.
सावंत : यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण तत्कालीन सरकारला का टिकवता आलं नाही? ठाकरे यांच्या काळातील आरक्षण का गेलं? हा माझा प्रश्न आहे.
जरांगे-पाटील : शायनिंग दाखवायची कशाला? श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी नाही दाखवायची. ती शायनिंग तुमच्यापाशीच ठेवायची. मस्ती तिकडंच दाखवायची. आरक्षण का टिकलं नाही, हे बघावं, सांगावं जरा समाजाला. मस्तीतल्या गप्पा हाणायच्या उगीच. सावंत : दिलेलं आरक्षण कायद्याच्या चाकोरीमध्ये टिकलं पाहिजे.
जरांगे-पाटील : आरक्षण टिकतं का नाही, ते द्यायचं की नाही हे सरकारला कळतं आणि ते घ्यायचं का नाही, हे मराठ्यांना कळतं.
सावंत : दोन वर्षे आरक्षणावर कोणीच का बोललं नाही. आताच आरक्षणाचं वादळ का उठलं? वादळ कोण उठवतेय?
जरांगे-पाटील : त्यांना काय वादळ दिसलं हे माहीत नाही. परंतु, मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतेय हे खरं हाय. त्याला जर हे वादळ समजत असतील, त्याच्याबद्दल ते जर असं बोलत असतील तर ही मात्र मोठी शोकांतिका आहे मराठा समाजाची.
सावंत: आरक्षणाच्या मुद्यावर २०२४ मध्ये राजीनामा देण्याचं बघू या. बघू ना. ३१ डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम आहे बघू. आमचे राजे आहेत, छत्रपती आहेत. माझा मराठा समाज आहे. यांच्या माध्यमातून बघू ना. योग्य त्या वेळी, योग्य ती भूमिका घेऊ.
जरांगे-पाटील : काय असतं, गोरगरिबांची टिंगल टवाळी उडविणार ना हे लोक. पैसा खूप आहे ना. पैसा खूप आहे. मराठ्यांच्या जिवावर सगळ्या गोष्टी मिळाल्यात ना यांना. पोट वाढलं ना ह्यांचं. त्याच्यामुळं काय आता? भरून पुरले ना. यांना भरपूर आहे. त्यामुळे ती मस्ती आहे, ती पैशाची, श्रीमंतीची.
पालकत्त्व स्वीकारले
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या ३५ कुटुंबांचं पालकत्व मंत्री सावंत यांनी घेतलं. त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदतही केली. कार्यक्रमानंतरच्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी मराठा आरक्षणावर सुतळी बॉम्ब फोडले आणि ते वादात सापडले.