अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे. तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडल अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांनी संगणमत करून २२ प्लॉटच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी ४४ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून त्यांनी ४० हजार रुपये स्वीकारले. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांच्या पथकाने केली.
तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या संयुक्त मालकीचा प्लॉट सावेडीत होता. या प्लॉटचे विभाजन करून त्यावर २२ स्वतंत्र प्लॉट तयार करण्याचे काम सुरू होते. तलाठी सागर भापकर यांनी या प्लॉटच्या ऑनलाईन फेरफार नोंदीसाठी ४४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ४० हजार रुपये देण्यास तक्रारदार तयार झाले. दररम्यान, मंडल अधिकारी, सावेडी शैलजा देवकाते यांनी तक्रारदार यांच्याकडून प्लॉट फेरफार नोंदी मंजुर करुन घेण्यासाठी ४४ हजार रुपये रक्कम स्विकारल्याचे मान्य केले.
तसेच तलाठी सागर भापकर यांने प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे २२ प्लॉटचे ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सापळा अधिकारी सापळा पर्यवेक्षण अधिकारी- प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, शरद गोर्डे, तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक छाया देवरे, पो.कॉ. सचिन सुद्रुक, पो.कॉ. बाबासाहेब कराड, चालक पो.हे.कॉ.हारून शेख आदींनी केली आहे.