पारनेर / नगर सह्याद्री : श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या काळात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष शालिनी अशोक घुले व विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी दिली. याआधी चंपाषष्ठीच्या दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असे.
परंतु मनुष्यबळ व आर्थिक झळ देवस्थानला बसत असल्याने सर्व विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये वार्षिक यात्रा उत्सवाच्या काळामध्ये हा सप्ताह घेण्याचे ठरले आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन होणार असल्याची माहिती घुले यांनी दिली.
१२ वर्षांपूर्वी वार्षिक यात्रोत्सवाच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात होते. परंतु मध्यंतरी चंपाषष्ठीच्या काळात या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते होते. त्यामुळे वेळ, पैसे व मनुष्यबळाची बचत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला देवस्थान अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, जेष्ठ विश्वस्त अॅड. पांडुरंग गायकवाड, माजी सरपंच अशोक घुले, विश्वस्त राजेंद्र चौधरी, विश्वस्त चंद्रभान ठुबे, जालिंदर खोसे, कमलेश घुले, सुवर्णा घाडगे, अजित महांडुळे, रामचंद्र मुळे, सुरेश फापाळे, दिलीप घुले, महादेव पुंडे आदी विश्वस्त उपस्थित होते.
नव्या विश्वस्त मंडळांचे चांगले काम
श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा पदभार एक वर्षांपूर्वी अध्यक्ष शालिनी घुले यांच्यासह नव्या विश्वस्त मंडळांने घेतला. देवस्थानच्या बँक खात्यावर फक्त २ हजार ९५४ रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली आहे. कोरोना काळातील कर्मचाऱ्यांची थकीत पगार नवीन विश्वस्त मंडळाने दिला आहेत. मोठ्या आर्थिक अडचणीतून देवस्थानला नव्या विश्वस्त मंडळांनी बाहेर काढले असून सध्या त्यांच्या खात्यावर ८ ते ९ लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती विश्वस्त मंडळांनी दिली आहे.
देवस्थानसाठी १५० कोटींचा आराखडा
ब वर्ग असलेल्या तीर्थक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा १५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले व उपाध्यक्ष महेश शिरोळे यांनी दिली. आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने देवस्थान परिसरात बागबगीचा, व्हीआयपी व्यक्तींसाठी विश्रामगृह, तारांकित म्युझियम, भंडारा डोंगर ते मंदिरा पर्यंत रोप वे, ३ हजार स्क्वे,फुटाचा हॉल व डिजिटल कमान या प्रमुख कामांचा समावेश आहे.
तसेच यात्रेच्या काळात मंदिर परिसराकडे येणारे तीन रस्ते भंडारा डोंगर ते नांदुर पठार, अक्कलवाडी ते मंदिर डोंगर, साडवा पाझर तलाव ते मंदिर या तीन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अशोक घुले यांनी दिली.